वडिलांचा दातृत्वाचा वारसा चालविला मुलामुलींनी!

विकास जाधव
शनिवार, 20 जुलै 2019

शाळेवरील प्रेम अन्‌ गरिबांच्या मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे, या कळवळ्यातून अतीत (ता. सातारा) येथील माजी सैनिक प्रल्हाद जाधव यांनी एक लाख ६१ हजार रुपयांची देणगी दिली होती. त्यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने त्यांच्या विवाहित मुली आणि मुलाने दातृत्वाचा कित्ता गिरविला असून, नुकताच त्यांनी आणखी ५१ हजार रुपयांचा निधी रणजित कौर गडोख खालसा महाराष्ट्र विद्यालयास दिला.

काशीळ - शाळेवरील प्रेम अन्‌ गरिबांच्या मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे, या कळवळ्यातून अतीत (ता. सातारा) येथील माजी सैनिक प्रल्हाद जाधव यांनी एक लाख ६१ हजार रुपयांची देणगी दिली होती. त्यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने त्यांच्या विवाहित मुली आणि मुलाने दातृत्वाचा कित्ता गिरविला असून, नुकताच त्यांनी आणखी ५१ हजार रुपयांचा निधी रणजित कौर गडोख खालसा महाराष्ट्र विद्यालयास दिला.

अतीत येथील माजी सैनिक प्रल्हाद जाधव यांचे शिक्षण अतीत मध्येच झाले. त्यांचे गावातील रणजित कौर गडोख खालसा विद्यालयाबद्धल त्यांच्या मनात मोठी आस्था, प्रेम होते. शिक्षणानंतर ते भारतीय लष्करात भरती झाले होते. कालांतराने ते निवृत्त झाले. मात्र, त्यांचे जेथे शिक्षण घेतले त्या अतीतच्या शाळेवर प्रेम होते. शाळेने दिलेल्या शिक्षणामुळेच जीवनात काही करू शकलो या विचारातून त्यांनी दीड वर्षापूर्वी शाळेतील मुलांना भौतिक सुविधा मिळाव्यात, गरीब मुलांना शिक्षणासाठी मदत व्हावी या उद्धेशाने एक लाख ६१ हजार रुपयांची देणगी दिली होती. मात्र, त्यानंतर त्यांचे निधन झाले. नुकतेच त्यांचे वर्षश्राद्धही झाले. त्या वेळी धार्मिक विधींसाठी मुलगा संतोष जाधव यांच्यासह विवाहित मुली अनिता आणि सुनीता ढाणे याही उपस्थित होत्या. या वेळी त्यांनी शाळा आणि शिक्षणावर असलेले वडिलांचे प्रेम लक्षात घेऊन वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शाळेला आणखी ५१ हजार रुपये देणगी देण्याचा निर्णय घेतला आणि विद्यालयात नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात देणगीचा धनादेश दिला. प्राचार्य राजेंद्र साळुंखे यांनी धनादेश स्वीकारला. 

त्या वेळी झालेल्या कार्यक्रमास स्कूल समितीचे सुधीर जाधव, बाळासाहेब लोहार, एस. के. बरगल, दीपक ढाणे, रविराज निकम, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. या देणगीबाबत सुनीता ढाणे म्हणाल्या, ‘‘आमचे वडील (कै.) प्रल्हाद जाधव यांनी अनेकांना मदत केली आहे. शाळेवर त्यांचे खूप प्रेम होते. शाळेला जास्तीतजास्त मदत करण्याची त्यांची इच्छा होती. म्हणूनच आम्ही त्यांच्या स्मरणार्थ शाळेला देणगी दिली आहे.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: School Donation Help Motivation