बचत गट चळवळ बनली गावासाठी आधार

सुनील शेडगे
गुरुवार, 20 जून 2019

अवजार बॅंकेनंतर बचत गटामार्फत लवकरच राइस मिल, पोहा मेकिंग मिल, शेततळी, विहीर, तसेच सुगंधी औषधी वनस्पती व तेलनिर्मिती हे लघुउद्योग हाती घेण्यात येणार आहेत.
- प्रमोद भोसले, रेवंडे, ता. सातारा.

नागठाणे - ‘गाव करील ते राव काय करील’ ही उक्ती सर्वार्थाने साध्य करताना रेवंडे या दुर्गम भागातील गावाने बचतगटाची चळवळ स्वतःसाठी आधार बनविली आहे. केवळ १०० रुपयांवर सुरू झालेल्या इथल्या बचत गटाने शासनाच्या सहकार्याने तब्बल एक कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी सामूहिक शेती प्रकल्प हाती घेतला आहे.

रेवंडे हे सातारा तालुक्‍यातील गाव. डोंगर उंचावरील या गावापुढे कित्येक प्रश्न उभे ठाकलेले. वाढते पर्जन्यमान, दळणवळणाच्या समस्या, उदरनिर्वाहाचे खात्रीशीर साधन नाही. गावातील बहुसंख्य लोक कामानिमित्त मुंबईला वास्तव्यास असतात. भात हे मुख्य पीक. अर्थात तेही पाऊसमानावर अवलंबून. अशात २०१० मध्ये गावात शेतकरी स्वयंसहायता बचतगटाची स्थापना झाली. केवळ १०० रुपये मासिक बचतीवर या गटाची सुरवात झाली.

२०१३ मध्ये बचतगटातर्फे फळबाग लागवड करण्यात आली. गटातील सदस्यांना आंबा, फणस, लिंबू  या झाडांचे वाटप करण्यात आले. त्यातून पर्यावरण समतोल राखण्याचा प्रयत्न करण्यात आला. २०१७ मध्ये बचतगटामार्फत रेशनिंग धान्य दुकान सुरू करण्यात आले. त्यामुळे एरवी होणारी ग्रामस्थांची मोठी पायपीट थांबली. आता या बचतगटाने एक कोटी रुपयांचा समूह शेतीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प शासनाच्या सहकार्याने हाती घेतला आहे. त्यादृष्टीने शेतीसाठी आवश्‍यक ठरणाऱ्या २० लाख रुपयाच्या अवजारांची खरेदी नुकतीच करण्यात आली आहे. त्यात ग्रास कटर, वूड कटर, चिखलणी यंत्र, पावर विडर, पावर टिलर, फणपाळी, विविध प्रकारचे नांगर, स्वयंचलित पेरणी यंत्र, रोटर, भात मळणी यंत्र, मल्टीक्राप मळणी यंत्र, ट्रॅक्‍टर व ट्रॉली आदी अवजारे खरेदी करण्यात आली आहेत. त्याचा लाभ केवळ गावापुरता मर्यादित न राहता परिसरातील शेतकऱ्यांनाही होणार आहे.

त्यामुळे आर्थिक प्राप्तीस हातभार लागणार आहे. बचतगटाच्या या प्रकल्पासाठी कृषी विभाग, विविध शासकीय विभाग, ग्रामस्थ तसेच मुंबईकर मंडळाचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Self Help Group Support Village motivation