झोपडपट्टीसाठी रोज पन्नास माठांचे वाटप

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

तो गरिबांना अन्न पुरवतो. मुलांना कपडे नसतील तर ते देतो. ज्या मुलांच्या पालकांना रोजगारातून वेळ मिळत नाही, अशा मुलांची विचारपूस व देखभालही तो करतो. अशा रियाज तांबोळी या अवलियाने रोज ५० ते ६० माठ झोपडपट्टी व चाळीत दान करून नागरिकांच्या घशाला पडलेली कोरड थंड पाण्याने भागवली आहे.

गोकुळनगर - तो गरिबांना अन्न पुरवतो. मुलांना कपडे नसतील तर ते देतो. ज्या मुलांच्या पालकांना रोजगारातून वेळ मिळत नाही, अशा मुलांची विचारपूस व देखभालही तो करतो. अशा रियाज तांबोळी या अवलियाने रोज ५० ते ६० माठ झोपडपट्टी व चाळीत दान करून नागरिकांच्या घशाला पडलेली कोरड थंड पाण्याने भागवली आहे.

कोंढव्यातील कौसर बागेजवळ, येवलेवाडी, कात्रज-कोंढवा रस्त्यावर अनेक बांधकामे चालू आहेत. तेथे कामगारांच्या तात्पुरत्या चाळी उभारण्यात आल्या आहेत. त्या चाळीतील मुले दिवसभर रस्त्यावर खेळत असतात. त्या मलांना तहान लागली की शेजारील हॉटेल व टपरीवर ती जातात. हे रियाज तांबोळी यांनी हेरले. काही स्वतःच्या  खिशातून तर काही लहान संस्थांच्या माध्यमातून देणगी घेऊन माठ घेतले. ज्याच्या घरी माठ नाहीत अशा चाळीतील अनेक घरांमध्ये जाऊन माठ रोज धुऊन भरायचा, दर आठ दिवसांनी तो कोरडा करून उन्हात ठेवायचा, माठातील पाणी झिरपले की ते पाणी पिण्यायोग्य कसे आहे, याचे लहान मुलांना शिक्षण देऊन त्या माठांचे वाटप करत आहे. माठात हात घालू नये म्हणून त्याला तोटी बसविण्यात आली आहे. 

गेली तीन ते चार वर्षे फक्त चाळीतील उपाशी असलेल्या मुलांना व घरातील महिला व पुरुषांना बिर्याणी व खाद्यपदार्थ  देत आहे. आता तर रियाजने या चाळीतील मुलांना व त्याच्या घरातील महिलांना मायेचा थंडावाही दिला आहे. रियाजच्या या कामाचे कौतुक होत असून असंख्य देणगीदार माठ भेट देण्यासाठी पुढे येत आहेत. आपल्यालही काही लहानग्याची तहान भागवायची असल्यास आपणही मदत करू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Slum Math Distribution Humanity Motivation