...आणि सखाराम ठणठणीत बरा झाला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 एप्रिल 2019

सगळ्यांनी मदत केली, आता बरं वाटतंय. आनंद वाटतोय. पुन्हा तपासणीला जाणार आहे. आता काही अडचण नाही,’’ एवढ्या शब्दांत मदत करणाऱ्या प्रत्येक ज्ञात-अज्ञाताविषयी कृतज्ञतेचा भाव व्यक्‍त केला.
- सखाराम धुमाळ
 

कोल्हापूर - अपार्टमेंटमध्ये वॉचमन असलेल्या सखाराम यांना चक्कर आली. दवाखान्यात नेले, मेंदू विकाराची लक्षणे दिसली. शस्त्रक्रियेचा खर्च पुढे आला. ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले. ते वाचून दातृत्वाचे अनेक हात पुढे आले. २५० रुपयांपासून २५ हजारांची रक्कम देत काही लाखांची रक्कम जमा झाली. सखाराम लहू धुमाळ (वय ३७) यांच्यावर मुंबईत यशस्वी शस्त्रक्रिया झाली आणि ते ठणठणीत बरे झाले.  

‘विश्‍वपंढरी’जवळ जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी हाउसिंग सोसायटीची अपार्टमेंट आहे. त्या लगतच पत्र्याच्या शेडमध्ये सखाराम पत्नी व दोन मुलांसह राहतात. त्यांना एक दिवस अचानक चक्कर आली. ते खाली कोसळले. आर्किटेक्‍ट अजय खतकर यांनी त्यांना डॉ. केळवकर यांच्या दवाखान्यात नेले. तिथे तपासणी केल्यावर सखाराम यांना मेंदू विकार झाल्याचे निदान झाले. अन्य डॉक्‍टरांचा सल्ला घेतला. शस्त्रक्रिया करावी लागणार होती. ही शस्त्रक्रिया स्थानिक पातळीवर शक्‍य नसल्याने सखाराम यांना मुंबईस न्यावे लागणार होते. खर्चाचा प्रश्‍न आला. 

श्री. खतकर यांनी पुढाकार घेत अनेकांना मदतीचे आवाहन केले. सखारामला मदत करण्याबाबतची बातमी ‘सकाळ’मधून प्रसिद्ध झाली. बातमी वाचून धनगर समाजापासून ते जिल्हा आरोग्य कर्मचाऱ्यांपर्यंत अनेकांनी आर्थिक मदत दिली. 

आमदार प्रकाश आबिटकर यांनीही मुंबईतील नामांकित रुग्णालयात मेंदू विकार तज्ज्ञांची अपॉइंटमेंट घेण्यापासून ते तेथील आमदार निवासात राहण्याची सोय केली. सखाराम यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया यशस्वी झाली. पंधरा दिवसांत मुंबईतील राजू घाटगे हेही मदतीला धावून आले. त्यांनी रक्त पिशव्यांपासून रोजची सखारामची सेवा केली. अंथरुणाला खिळून पडलेले सखाराम उठून बसू लागले. डिस्चार्ज दिला, सखाराम पुन्हा कोल्हापुरात सुखरूप आले. 

दातृत्व वाया जात नाही
कोल्हापूरकरांच्या दातृत्वाचे फलित म्हणजे कोणाला तरी हमखास जीवदान मिळते. दातृत्व कधी वाया जात नाही, याचीच प्रचीती व समाधान सखारामला मदत करणाऱ्या प्रत्येकाला लाभले असेल, असे मत सखारामना चक्कर आल्यापासून ते बरे होऊन घरी येईपर्यंत त्यांना सोबत करणाऱ्या आर्किटेक्‍ट अजय खतकर यांनी व्यक्त केली.

सगळ्यांनी मदत केली, आता बरं वाटतंय. आनंद वाटतोय. पुन्हा तपासणीला जाणार आहे. आता काही अडचण नाही,’’ एवढ्या शब्दांत मदत करणाऱ्या प्रत्येक ज्ञात-अज्ञाताविषयी कृतज्ञतेचा भाव व्यक्‍त केला.
- सखाराम धुमाळ

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: social help to Sakharam Dhumal for surgery special story