‘इलेक्‍ट्रॉनिक नोज’ दर्शवेल फळांचा ताजेपणा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 डिसेंबर 2017

सोलापूर - फळे ताजी आहेत अथवा नाही, हे तपासण्यासाठी ‘इलेक्‍ट्रॉनिक नोज’ या यंत्राचा शोध सोलापूर विद्यापीठातील इलेक्‍ट्रॉनिक विभागातर्फे करण्यात आला आहे. प्रा. मेघना कसबे यांनी हे यंत्र तयार केले आहे.

सोलापूर - फळे ताजी आहेत अथवा नाही, हे तपासण्यासाठी ‘इलेक्‍ट्रॉनिक नोज’ या यंत्राचा शोध सोलापूर विद्यापीठातील इलेक्‍ट्रॉनिक विभागातर्फे करण्यात आला आहे. प्रा. मेघना कसबे यांनी हे यंत्र तयार केले आहे.

‘मॉनिटरिंग सिस्टिम टू डिटरमाईन फ्रेशनेस ऑफ फ्रूट्‌स अँड व्हेजिटेबल यूजिंग ॲन इलेक्‍ट्रॉनिक नोज’ या विषयावर प्रा. कसबे यांनी संशोधन केले आहे. फळांमधून विविध प्रकारचे वायू निघत असतात. या वायूंचे रूपांतर इलेक्‍ट्रॉनिक स्वरूपात केले जाते. या यंत्राला संगणकाची जोड देण्यात आली आहे. ‘लॅब व्ह्यू’ व ‘मॅट लॅब’च्या कोडिंगद्वारे माहितीवर प्रक्रिया केली जाते. यंत्रामध्ये ‘आर्टिफिशल न्यूरल नेटवर्क’चाही वापर करण्यात आला आहे.

संगणकामध्ये माहिती साठवलेली असते, या माहितीसोबत फळांच्या वायूची इलेक्‍ट्रॉनिक स्वरूपाशी तुलना केली जाते. सॉफ्टवेअरच्या माध्यमातून या दोन्हीची तुलना झाल्यानंतर फळे कोणत्या स्थितीत आहेत, याची माहिती संगणकावर दिसू लागते. हे यंत्र तयार करण्यासाठी सेन्सरचा वापर करण्यात आला आहे. 

या यंत्राच्या साह्याने सध्या काही फळांची स्थिती पाहता येते; मात्र डेटाबेस व यंत्रात थोडेसे बदल केल्यास कोणत्याही फळाची सद्यःस्थिती या यंत्राद्वारे पाहता येऊ शकेल. या यंत्राचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे यंत्र वायरच्या साह्याने तसेच वायरलेस अशा दोन्ही पद्धतीने वापरता येऊ शकते. ज्या ठिकाणी जास्त फळे साठवून ठेवलेली असतात, तिथे या यंत्रांचा चांगला वापर होऊ शकतो. 

या संशोधनासाठी सोलापूर विद्यापीठातील अप्लाईड इलेक्‍ट्रॉनिक्‍स विभागप्रमुख डॉ. एल. पी. देशमुख व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डॉ. ए. डी. शाळिग्राम यांनी प्रा. कसबे यांना मार्गदर्शन केले. 

फळे किती दिवस चांगली राहू शकतात, हे पाहण्यासाठी त्यांची वारंवार तपासणी करावी लागते. या यंत्रामुळे इलेक्‍ट्रॉनिक स्वरूपात फळांच्या स्थितीवर लक्ष ठेवता येते. यासाठी वारंवार फळांना तपासण्याची गरज नाही. 
- प्रा. मेघना कसबे, संशोधक, सोलापूर विद्यापीठ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: solapur news electronic nose machine