लाइक, कमेंटच्या पुढे जात मदतीचा हात

लाइक, कमेंटच्या पुढे जात मदतीचा हात

सोशल साइट्‌सच्या माध्यमातून उपचारासाठी सव्वा लाख जमा
सोलापूर - सोशल मीडियावर लाइक, कमेंटच्या पुढे जात अनेक जण गरजवंतांना मदतीचा हात देत आहेत. याचा अनुभव बार्शी तालुक्‍यातील पारधी समाजातील अमोल राजकुमार काळे या युवकाला आला आहे.
फेसबुक, व्हॉट्‌सऍप, ट्‌विटर आदी सोशल साइट्‌सवर एकत्र आलेल्यांचा विखार अनेकदा दिसतो; पण याच माध्यमातून अनेकांना करुणेचा पाझर फुटतो. समाजात अजूनही चांगली माणसं असल्याची प्रचिती येते. ही प्रचिती अमोलला आली आहे. अमोल हा पारधी समाजातील युवक बार्शीतील शाहू लॉ कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. त्याचे 11 जूनला 2017 ला लग्न झाले. यानंतर 20 जूनला बार्शीहून पत्नीसह मोटारसायकलवर कोरफळेला जाताना कव्हेगावजवळ अपघात झाला. या अपघातात त्याच्या मेंदूला मार लागला.

वाहनाच्या धडकेने हरीण मेल्याची पोस्ट बार्शीच्या "स्नेहग्राम'चे महेश निंबाळकर यांनी फेसबुकवर टाकली. मात्र. त्यानंतर निंबाळकर यांनीच अमोलच्या उपचाराचा खर्च आवाक्‍याबाहेर असल्याची पोस्ट टाकत मदतीचे आवाहन केले. त्यानंतर तिसरी पोस्ट त्यांनी टाकली. त्यात माझ्या फेसबुक मित्रांनो, अर्धी लढाई जिंकली आहे. अमोलवर दोन शस्त्रक्रिया झाल्या असून, त्याला एक महिना दवाखान्यात ठेवावे लागेल.

तुम्ही माझे साडेचार हजार मित्र आहात. तुमची माझी प्रत्यक्ष ओळख नसली तरी माणुसकीच्या भावनेतून प्रत्येकाने शंभर रुपये दिले तर त्याचा उपचाराचा खर्च भागू शकतो, असे आवाहन केले. त्यासाठी त्याच्या आईचा अकाउंट नंबर दिला. त्यानंतर मदतीचा ओघ वाढला. ही पोस्ट 46 जणांनी शेअर केली. अनेकांनी पैसे जमा केल्याची ई रिसीट टाकली. पुणे, मुंबईसह सोलापूरपासून गडचिरोलीच्या लोकांनी मदत केली. अमेरिकेतील प्रगती राजाध्यक्ष आणि दीपक सोनावणे या फेसबुक मित्रांनीही मदत केली. त्यासाठी अमोल देशमुख, सुहास निंबाळकर, बालाजी डोईफोडे, तुकाराम गोडसे, नीलेश झाल्टे यांनीही फेसबुकवरच मदतीचे आवाहन केले. त्यातून एक लाख 20 हजार जमा झाले आहेत.
अमोल सध्या सोलापुरातील गंगामाई हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. त्याच्या मेंदूवरही शस्त्रक्रिया झाली आहे. त्याचा एकूण खर्च सुमारे पाच लाखांपर्यंत येणार आहे. फेसबुकवरच मुख्यमंत्री सहायता निधीचे काम बघणारे ओमप्रकाश शेटे यांनीही मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत करू, असे सांगितले.

विश्‍वासार्हता आणि पारदर्शकता या बळावर मदत मिळते. अमोलला आणखी मदतीची गरज आहे. त्याच्या आईच्या खात्यावर मदत जमा करावी. अजूनही समाजापासून तुटलेल्या पारधी समाजातील युवकासाठी लोकांनी केलेली मदत उमेद वाढविणारी आहे.
- महेश निंबाळकर, स्नेहग्राम कोरफळे (ता. बार्शी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com