दोघांना जीवदान देणारा रोहित! 

मनोज गायकवाड
बुधवार, 10 जानेवारी 2018

मुले बुडताना पाहून कशाचाही विचार न करता पाण्यात सूर मारला. वाहत्या पाण्यात खूप संघर्ष केला आणि दोघांना वाचवले. तिसऱ्यालाही काढत होतो पण त्याने घाबरून माझ्या गळ्याला मिठी मारली. मिठी सोडवताना तो मुलगा हातून निसटला. त्याला वाचवू शकलो नाही. मलाही खूप दम लागला होता. खूप पाणी पोटात गेले होते. भरपूर उलट्या झाल्या. तरीही त्या दोघांना वाचवता आले नाही, याचे मोठे शल्य मनात आहे. 
- रोहित साठे 

अकलूज - कालव्यातील पाण्यात चार कोवळ्या जिवांना मृत्यूने गाठले होते. काळानेच झडप घातली. चौघांचा अखेरचा प्रवास सुरू होता. हा कोलाहल पाहून त्याने थेट पाण्यात सूर मारला. जिवाच्या बाजीने दोन सख्या भावांना वाचविले. त्याचे प्रसंगावधान, धाडस आणि शौर्य याला सलाम. दोघांना वाचविणाऱ्या त्या तरुणाचे नाव आहे रोहित तानाजी साठे. 

बोरगांव (ता. माळशिरस) येथे 30 एप्रिल 2017 रोजी घडलेली ही घटना. मुंबई येथील सतीश लोणी यांचे प्रसन्न (वय 10) आणि ओम (13) हे दोन मुलगे उन्हाळ्याच्या सुटीसाठी श्रीपूरला, मामाच्या गावी आले होते. त्या दिवशी ऊन खूप होते. गावाशेजारील उजनीच्या उजव्या कालव्याला आवर्तनाचे पाणी सोडलेले होते. पोहायला जाण्याचा निर्णय झाला. प्रसन्न आणि ओम हे भाचे आणि आपली विराज आणि विकी ही दोन मुले घेऊन संतोष शिवनगी उजनीच्या कालव्यावर गेले. पोहण्यासाठी मुलांनी कपडे काढले. त्या वेळी रोहित तेथे पोहण्यासाठी आला. कालव्याच्या पाण्यात तो चपला धूत होता. पाण्यात उतरू पाहणारी ही चार मुले त्याला दिसली. कालव्याच्या प्रवाहाला ओढ असल्याची कल्पना त्याने संतोषला दिली. तेवढ्यात मुले पाण्यातही उतरली. कालव्याची खोली आणि पाण्याची ओढ याची मुलांना कल्पनाच नव्हती. 

बघता बघता तीन मुले कालव्याच्या मध्यभागी गटांगळ्या खाऊ लागली. कशाचाही विचार न करता रोहितने पाण्यात सूर मारला. साधारणतः पन्नास-साठ मीटरपर्यंत वाहून गेलेल्या मुलाला त्याने पकडले. कालव्यात उगवलेल्या झुडपाची फांदी धरून रोहितने त्या मुलाला बाहेर आणले. तोपर्यंत अन्य तिघे खूप दूर गेले. रोहितने पुन्हा पाण्यात उडी मारली. सुमारे दीडशे मीटरपर्यंत वाहून गेलेल्या दुसऱ्या मुलाला पकडून बाहेर आणले. याचवेळी गटांगळ्या खाणारा तिसरा मुलगा जिवाच्या आकांताने रोहितला हाका मारत होता. वेगवान प्रवाह आणि दोन मुलांना बाहेर काढल्याने रोहितलाही दम लागला होता. त्याने तिसऱ्या मुलाला वाचवण्यासाठी पुन्हा पाण्यात सूर मारला. घाबरलेल्या मुलाने रोहितच्या गळ्यालाच घट्ट मिठी मारली. रोहितने प्रयत्नपूर्वक सुटका करून घेतली. तोपर्यंत मुलगा पाण्यात दिसेनासा झाला. पुढे कालव्यावरील पुलाचा बोगदा आला. बोगद्यात जाणे धोकादायक होते. विराज आणि विकी या सख्ख्या भावांना वाचविण्यात रोहितला यश आले. रोहितचे प्रसंगावधान, धाडस आणि मृत्यूच्या दाढेतून दोन जिवांना खेचून बाहेर आणण्यात आलेले यश अतुलनीय असेच आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: solapur news rohit sathe story