सोलापूरच्या ओंकारमुळे सहा जणांना जीवदान

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

सोलापूर - महाराष्ट्र - कर्नाटकचा सीमावाद कितीही टोकाचा असला, तरी आजच्या माणुसकीच्या जिवंत झऱ्यामुळे तो काही काळासाठी का असेना, परंतु विस्मृतीत गेला. निमित्त होते कर्नाटकातील युवकाच्या हृदयाचे पुण्यातील रुग्णास प्रत्यारोपणाचे. ओंकार अशोक महिंद्रकर (वय २१, रा. ता. बसवकल्याण) हा रविवारी बसवकल्याण येथे झालेल्या अपघातात ब्रेनडेड झाला होता. त्याला बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार केंद्र येथे दाखल केल्यानंतर डॉक्‍टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार ओंकारच्या आईने त्याचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्याचे ह्रदय, यकृत, मूत्रपिंड व नेत्रपटल गरजू व्यक्तींना दान करण्यात येणार आहेत.

सोलापूर - महाराष्ट्र - कर्नाटकचा सीमावाद कितीही टोकाचा असला, तरी आजच्या माणुसकीच्या जिवंत झऱ्यामुळे तो काही काळासाठी का असेना, परंतु विस्मृतीत गेला. निमित्त होते कर्नाटकातील युवकाच्या हृदयाचे पुण्यातील रुग्णास प्रत्यारोपणाचे. ओंकार अशोक महिंद्रकर (वय २१, रा. ता. बसवकल्याण) हा रविवारी बसवकल्याण येथे झालेल्या अपघातात ब्रेनडेड झाला होता. त्याला बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार केंद्र येथे दाखल केल्यानंतर डॉक्‍टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार ओंकारच्या आईने त्याचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्याचे ह्रदय, यकृत, मूत्रपिंड व नेत्रपटल गरजू व्यक्तींना दान करण्यात येणार आहेत. त्याच्या अवयवदानामुळे सहा लोकांना जीवदान मिळणार आहे. 

ओंकारच्या आई-वडिलांनी अवयवदानाची इच्छा व्यक्त केल्यानंतर ही प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्‍टरांनी बुधवारी रात्री दहापासूनच अथक परिश्रम घेतले. अनेक चाचण्या घेऊन ओंकारचे कोणते अवयव दान करता येऊ शकतात याची तपासणी करण्यात आली. अधिष्ठाता डॉ. सुनील घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे व सोलापुरातील वीसहून अधिक डॉक्‍टरांनी यात सहभाग घेतला. पुण्यातील डॉक्‍टरांचे पथक पहाटे ४ वाजता सोलापुरात दाखल झाले होते. 

असे पाठविले अवयव
हृदय व यकृत हे विमानाने, तर मूत्रपिंड रस्तामार्गे पुण्यास पाठवले. पुण्यातील रुबी हॉल क्‍लिनिक व नोबल हॉस्पिटल या ठिकाणी हे अवयव पाठविण्यात आले. त्या ठिकाणी गरजू व्यक्तींमध्ये या अवयवांचे प्रत्यारोपण करण्यात येईल. ओंकारचे अवयव पुण्यास पाठविण्यासाठी सोलापुरात पोलिसांनी ग्रीन कॉरिडॉर ऑपरेशन राबविले. त्यामध्ये सर्वोपचार रुग्णालय ते विमानतळ व सर्वोपचार रुग्णालय ते पुणे नाका यादरम्यान वाहतूक बंद करून अवयवांना वाट करून देण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: solapur news Six people life saving by Omkar mahindrakar