ओझे वाहणाऱ्या सावित्रीच्या लेकींना दिला हातगाडा

विजयकुमार सोनवणे 
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

सोलापूर -  वर्षानुवर्षे ओझं वाहून, हातपाय थकले, पोटासाठी वाहतो ओझे, जीवन जगण्याचे तेच साधन आमुचे.... गेल्या चाळीस-पन्नास वर्षांपासून सोलापुरातील फलटण गल्लीत गाडा ओढण्याचे काम करणाऱ्या कोंडाबाई सिद्राम शिंगे व पार्वती ढावरे यांना राखी पौर्णिमेचे औचित्य साधून रविवारी अनोखी भेट मिळाली. त्यासाठी पुढाकार घेतला येथील श्री सिद्धेश्‍वर प्रशालेतील माजी विद्यार्थ्यांनी. दोघींनाही नवीन हातगाडा देऊन या विद्यार्थ्यांनी अनोखे रक्षाबंधनाचा आदर्श सर्वांसमोर ठेवला. 

कर्तबगार मुले असल्यामुळे सुखी जीवनाचे स्वप्न होते. मात्र, प्रत्येकाने आपला स्वतंत्र संसार थाटल्याने हे स्वप्नही पूर्ण झाले नाही. त्यामुळे लग्नानंतर ते आजतागायत ओझं वाहतच संसाराचा गाडा चालविण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. सकाळी कामावर निघायचे. दिवसभरच्या काबाडकष्टातून कसेबसे १०० ते १२५ रुपये सुटतात. त्यापैकी ३० ते ४० रुपये गाड्याच्या भाड्यासाठी द्यावे लागतात. वाहतुकीची अनेक साधने झाल्यामुळे गाडा हाकणाऱ्यांची मागणीही कमी झाली आहे. त्यामुळे मिळेल त्या भाड्यात ओझे वाहण्याचे काम करावे लागते, आतापर्यंतचा अनुभव सांगितला कोंडाबाई शिंगे यांनी. 

बाईमाणूस हातगाडी ओढते हे पाहिल्यावर अनेकांनी आमचे फोटो छापले, मुलाखती नेल्या, टीव्हीवर दाखवले. ज्या लोकांनी पाहिले त्यांनी भेटल्यावर कोरडे कौतुक केले, आमदार, पोलिसांनी सत्कार केला; पण मदतीचा हात देण्यासाठी कुणी पुढे आला नाही. या मुलांनी केलेली मदत पाहून आम्हाला निश्‍चितच आनंद झाला आहे. कमी कष्टात जास्त पैसे मिळवण्याच्या आजच्या जमान्यात अविरत कष्ट करणाऱ्याकडे सर्वांचेच दुर्लक्ष असते, असे आम्हाला वाटत होते. हा आमचा समज या मुलांनी खोटा ठरविला, अशा शब्दांत पार्वती ढावरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: solapur news women