सोलार नेट मीटरिंगमुळे वीजबिल आले शून्यावर! 

दीपक क्षीरसागर 
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

लातूर - भरमसाट वीजबिल व खंडित वीजपुरवठ्यामुळे सामान्य नागरिक त्रस्त असताना सोलार नेट मीटरिंग या उत्तम पर्यायाचा व नैसर्गिक साधनांचा वापर करून विजेबाबत स्वावलंबी होता येते. शिवाय अतिरिक्त उत्पादित विजेच्या विक्रीतून उत्पन्नाचे स्रोत तयार करता येतात. याद्वारे महिन्याकाठी येणारे किमान 15-20 हजार रुपये वीजबिलाची बचत होऊन आता केवळ दीडशे रुपये बिल येत आहे. हा सुखद अनुभव तर आहेच. सोबत काहीतरी वेगळे केल्याचा आनंद घेण्याची संधी सीए सुनील कोचेटा यांनी मिळविली आहे. 

वाढत्या वीजबिलामुळे लाहन-मोठे असे सर्वच ग्राहक त्रस्त आहेत. या परिस्थितीत व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट असलेले सुनील कोचेटा यांच्याकडे सात एसी, दोन फ्रीज, विंधनविहीर आणि गिझरसाठी विजेचा वापर होतो. विजेच्या वाढत्या वापराच्या म्हणजेच एप्रिल व मे महिन्यांत त्यांना सरासरी 15-18 हजार रुपये प्रतिमहिना म्हणजे वर्षाला किमान दोन लाखांचे बिल भरावे लागायचे. महावितरणची नेट मीटर पॉलिसी (उपक्रम) जाहीर झाल्यानंतर त्यांनी घराच्या छतावर एक हजार स्क्वेअर फूट जागेत सोलार पॅनेल बसविले. 19 किलोवॉट सोलार ऊर्जानिर्मितीचे नियोजन आहे. त्यातील डीसी विजेचे इन्व्हर्टरद्वारे एसीत रूपांतर करून वापरले जाते. दिवसाला 40-50 युनिट वीजनिर्मिती होते. दिवसभर सौरऊर्जेतून वीजनिर्मिती होऊन वापरली जाते आणि अतिरिक्त उत्पादित झालेली वीज इम्पोर्ट-एक्‍स्पोर्ट सिस्टीमने महावितरणच्या ग्रीडला पुरविली जाते. गरजेनुसार महावितरणची वीज वापरून दरमहा त्याचा हिशेब ठेवला जातो. यासाठी किमान सहा-सात लाखांचा खर्च अपेक्षित आहे. 

प्रत्येक व्यक्तीने नैसर्गिक साधनांचा वापर करून सौर ऊर्जानिर्मितीतून प्रत्येक घर स्वयंपूर्ण होऊ शकते. वाढलेली वृक्षतोड व औष्णिक वीजनिर्मितीमुळे वैश्विक तापमानवाढीची समस्या वाढत आहे. सौर ऊर्जा पर्यावरणाला पोषक आहे. श्री. कोचेटा यांना वर्षाकाठी दोन लाखांवर वीजबिल भरावे लागत होते. आता भरपूर वीज उत्पादन व अल्प वापरामुळे महावितरणकडे 1600 युनिट वीज जमा होत आहे. सौर ऊर्जानिर्मितीमुळे वीज इतर ठिकाणी वापरता येऊ शकते. नागरिकांनी इच्छाशक्ती दाखवून गुंतवणूक केल्यास प्रत्येक घर सौर ऊर्जेवर स्वयंपूर्ण होईल. त्यासाठी बॅकिंग धोरणात बदल करण्याची व शासकीय अनुदानरूपी मदत वाढविण्याची गरज असल्याचे सीए कोचेटा यांचे मत आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solar Net mitaringamule electricity bill was zero!