सौर, कचरा व्यवस्थापनाद्वारे उपाय 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 एप्रिल 2019

शहरात सर्वत्र वीज आणि कचऱ्याचा प्रश्‍न भेडसावत आहे; मात्र ब्राव्हुरिया सोसायटीच्या सदस्यांनी तक्रार करत न बसता स्वत:च त्यावर उपाय शोधून प्रथम सौरऊर्जा प्रकल्प आणि त्यानंतर ओला कचरा व्यवस्थापन प्रकल्प चालू केला.

पुणे - शहरात सर्वत्र वीज आणि कचऱ्याचा प्रश्‍न भेडसावत आहे; मात्र ब्राव्हुरिया सोसायटीच्या सदस्यांनी तक्रार करत न बसता स्वत:च त्यावर उपाय शोधून प्रथम सौरऊर्जा प्रकल्प आणि त्यानंतर ओला कचरा व्यवस्थापन प्रकल्प चालू केला. त्यामुळे ओल्या कचऱ्याची समस्या सुटली आणि सौरऊर्जा प्रकल्पातून सदनिकाधारकांना मोफत गरम पाणी मिळू लागले. यामुळे प्रत्येक कुटुंबाची दरमहा पाचशे रुपयांची बचत होत आहे. याशिवाय महापालिकेने दोन्ही प्रकल्पांचे प्रत्येकी ५ टक्के या दराने प्रत्येक सदनिकाधारकांना मिळकत करातून १० टक्के सूट दिली आहे.

या प्रकल्पाबद्दल माहिती देताना सोसायटीचे चेअरमन चेतन भोंगाळे व सचिव नितीन लहाने म्हणाले, ब्राव्हुरिया सोसायटीमध्ये एकूण १४४ सदनिकाधारक आहेत. सोसायटीमध्ये २०१० मध्ये सौर पॅनेल बसविण्यात आले. प्रत्येक सदनिकाधारकाला वर्षभर गरम पाणी मिळते. दोन वर्षांतून एकदा या सौर पॅनेलची दुरुस्ती करावी लागते. त्याकरिता प्रत्येकी ५०० रुपये खर्च येतो. 

सोसायटीतील लिफ्ट, पाणीपुरवठा करणारा पंप, उद्यानातील प्रकाशव्यवस्था, पॅसेज, पार्किंगमधील दिवे यासाठी दरमहा सुमारे ७० ते ८० हजार रुपये बिल येते. ही व्यवस्थाही सौरऊर्जेवर करण्याची योजना असल्याचे व्यवस्थापक श्रीकांत घुगे यांनी या वेळी बोलताना सांगितले. 

सोसायटीमध्ये ओला आणि सुका कचरा स्वतंत्रपणे जमा केला जातो. सुका कचरा महापालिका कर्मचारी घेऊन जातात. मात्र ओला कचरा ते नेत नाहीत. यावर उपाय म्हणून तीन बाय अडीच फूट लांब व साधारण तीन फूट उंच अशा सात सिमेंटच्या टाक्‍या तयार केल्या आहेत. सोमवार ते रविवारपर्यंतच्या कचऱ्यासाठी या टाक्‍या आळीपाळीने वापरण्यात येतात. ठरलेल्या दिवसानुसार त्या त्या टाकीमध्ये कचरा टाकण्यात येतो. त्यावर रसायन फवारले जाते. त्यामुळे ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया होऊन तो माती सारखा होतो. हेच सेंद्रिय खत होय. 

पावसाळ्याच्या सुरवातीला एकेका टाकीतील खत जमा करून तो चाळला जातो आणि तो सोसायटीच्या उद्यानातील झाडांना दिला जातो. या खतामुळे फळे चांगली येतात तसेच पाने, फुले टवटवीत दिसत असल्याचेही भोंगाळे आणि लहाने यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solution through Solar, Waste Management