'देशाच्या सेवेतून आत्मिक समाधान'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 एप्रिल 2019

देशाची अंतराळातील सुरक्षितता लक्षात घेऊन भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) आणि डीआरडीओ यांनी ‘मिशन शक्ती’अंतर्गत उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली.

पिंपरी-  ‘‘मागील दोन वर्षांपासून ‘मिशन शक्ती’ची तयारी सुरू होती. ६ महिन्यांत तयारीने जोर धरला. आम्ही सर्व शास्त्रज्ञ आणि संशोधकांनी दिवस-रात्र एक करून ‘मिशन शक्ती’ मोहीम यशस्वी केली. प्रत्येकाकडे पैसा, संपत्ती, ऐश्‍वर्य येत राहते; परंतु देशासाठी काहीतरी करतोय, ही भावना खूप मोठी आहे. त्यातून खरे समाधान मिळते,’’ अशी भावना ‘डीआरडीओ’चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. राजेश करवंदे यांनी व्यक्त केली. 

देशाची अंतराळातील सुरक्षितता लक्षात घेऊन भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) आणि डीआरडीओ यांनी ‘मिशन शक्ती’अंतर्गत उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली. त्यात पिंपरी येथील हिंदुस्थान अँटिबायोटिक्‍स (एचए) स्कूलचे माजी विद्यार्थी आणि ‘डीआरडीओ’चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. करवंदे यांचेही योगदान राहिले. त्यानिमित्त ‘सकाळ’शी संवाद साधताना डॉ. करवंदे यांनी आपली भावना व्यक्त केली. एचए स्कूलचे मुख्याध्यापक एकनाथ बुरसे या वेळी उपस्थित होते. 

करवंदे म्हणाले, ‘‘संरक्षण क्षेत्रात काहीतरी करून दाखवायचे, अशी माझी लहानपणापासून इच्छा होती. माझे वडील शंकर करवंदे टपाल खात्यात होते. त्यांची पिंपरी-चिंचवडमध्ये बदली झाल्यावर एचए स्कूलमध्ये माझे दहावीपर्यंत शिक्षण झाले. अभ्यासात कामगिरी करून अभियांत्रिकी शाखेत उच्चशिक्षण घेतल्याने संशोधन क्षेत्राकडे वळालो. ‘डीआरडीओ’च्या सेवेत २००२ मध्ये रुजू झाल्यावर अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांत योगदान देता आले. काम करताना प्रत्येक गोष्ट सुरळीत पार पडतेच असे नव्हे, ‘मिशन शक्ती’ राबवितानाही अडचणी आल्या; परंतु आम्ही सर्व शास्त्रज्ञ आणि संशोधकांनी जबाबदारी चोख पार पाडली.’’    

‘मिशन शक्ती’ मोहीम फत्ते झाल्यावर बुरसे यांनी करवंदे यांचे अभिनंदन केले. या वेळी करवंदे यांनी हैदराबाद येथून एचए स्कूलच्या विद्यार्थ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधला. प्रत्येक वर्गातील ध्वनिक्षेपकाद्वारे विद्यार्थ्यांनी त्यांचे विचार ऐकले. शालेय  जीवनातील आठवणींनाही करवंदे यांनी उजाळा दिला.

जान भी देंगे... 
‘‘मनुष्याचे मरण अटळ आहे; परंतु तिरंग्यामध्ये स्वतःचे पार्थिव अंत्यविधीसाठी नेले जाणारे दृश्‍य खूप काही सांगून जाते’’, असे हृदयस्पर्शी उद्‌गारही करवंदे यांनी काढले. त्यामुळे, स्वतःच्या दूरध्वनीची रिंगटोनही त्यांनी ‘दिल दिया है..जान भी देंगे, ए वतन तेरे लिए,’ ठेवल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Spiritual solutions from the service of the country says Dr. Rajesh Karwande

टॅग्स