नक्षलग्रस्त भागातील ‘बसंती’ भारतीय रग्बी संघात 

संजय घारपुरे
बुधवार, 5 जुलै 2017

मुंबई - दक्षिण ओडिशातील कोरापुत हा जिल्हा प्रामुख्याने ओळखला जातो तो नक्षलग्रस्त जिल्हा म्हणूनच; पण याच डोंगराळ आणि नक्षलवाद्यांच्या हल्ल्याने बेजार झालेल्या परिसरातील ‘बसंती पांगी’ची निवड भारतीय रग्बी संघात झाली आहे. एवढेच नव्हे, तर पॅरिसला होणाऱ्या वर्ल्ड गेम्स स्पर्धेत ती भारताचे प्रतिनिधित्वही करणार आहे. 

मुंबई - दक्षिण ओडिशातील कोरापुत हा जिल्हा प्रामुख्याने ओळखला जातो तो नक्षलग्रस्त जिल्हा म्हणूनच; पण याच डोंगराळ आणि नक्षलवाद्यांच्या हल्ल्याने बेजार झालेल्या परिसरातील ‘बसंती पांगी’ची निवड भारतीय रग्बी संघात झाली आहे. एवढेच नव्हे, तर पॅरिसला होणाऱ्या वर्ल्ड गेम्स स्पर्धेत ती भारताचे प्रतिनिधित्वही करणार आहे. 

भुवनेश्‍वरच्या ‘कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स’मध्ये शिकणारी बसंती सध्या मुंबईत आली आहे. एका पत्रकार परिषदेच्या निमित्ताने तिच्याशी भेट झाली. तिला तोडकेमोडके हिंदी येते. इंग्रजी लिहू शकते; पण भारताच्या १८ वर्षांखालील रग्बी संघाची महत्त्वाची खेळाडू असलेली बसंती बोलायला मात्र फार इच्छुक नसते. तिच्याविषयी मिळालेल्या माहितीनुसार, बसंतीचे आई-वडील हे त्या परिसरातील काही शिकलेल्या लोकांपैकी एक. त्यांनी आपल्या या मुलीला आदिवासी मुला-मुलींसाठी काम करणाऱ्या या संस्थेच्या स्वाधीन करण्याचा निर्णय घेतला. तिथे तिला रग्बी हा खेळ आवडला, ती खेळू लागली आणि तिचा खेळ बहरत गेला. 

तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा हाती लागलं ते हे...

‘‘माझ्या गावाला भुवनेश्‍वरहून जायलाच सोळा तास लागतात. तेरा तास रेल्वेने प्रवास, त्यानंतर काही तासांचा टॅक्‍सीचा प्रवास आणि त्यानंतर तीन-चार किलोमीटर चालत अशा प्रवासानंतर माझे गाव येते. माझ्या गावात बारा-तेराव्या वर्षीच मुलींची लग्नं होतात. आता मी जेव्हा गावात जाते तेव्हा माझ्या वयाच्या मैत्रिणी भेटतात, त्यांनाही माझ्याप्रमाणेच खेळावंसं वाटतं. पण इच्छा असूनही ना त्यांना काही करता येत, ना मला... माझ्यापेक्षा लहान असलेल्या मुलींबाबत मात्र काही करू शकेन असे मला वाटते आहे, बघूया काय होते...’’  

‘‘मुलींनी शिकू नये अशीच तर त्यांची (नक्षलवादी) इच्छा असते. आमच्या संस्थेच्या लोकांनी आई-वडिलांना मला शिकण्यासाठी बाहेर पाठवण्यास सांगितले. ते तयार झाले आणि मला लपतछपत गावाबाहेर काढले. माझ्या शिक्षणाला सुरवात झाली. आता गावात परत जाताना फारसा प्रश्‍न येत नाही. कारण आता आमच्या गावातलेच पोलिस झाले आहेत. ते गावातच असतात,’’ असे ती सांगते.

ओडिशाची सुमित्रा नायक ही या संघाची कर्णधार. तीसुद्धा आदिवासी भागातील; पण ती सहजपणे बोलली. ‘‘आमच्या गावातल्या मुलींचा वेष अजूनही घागरा चोलीच आहे. त्याव्यतिरिक्त वेगळा वेष ‘त्यांना’ चालत नाही. आम्ही गावात जाताना आमचा खेळण्याचा गणवेष नाही घेऊन जात. परिस्थिती हळूहळू बदलेल; पण सध्याच्या परिस्थितीतही आम्हाला प्रोत्साहन मिळाले, रग्बी खेळण्याची संधी मिळाली हेही चांगलेच आहे ना.’’ 

ती अगदी सहजपणे हे सांगते. उद्या परिस्थिती बदलेल, ही भावना तिच्या डोळ्यात स्पष्टपणे दिसत असते!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news basanti pangi Rugby