esakal | सक्सेस स्टोरी : सेंद्रिय शेतीतून उभा केला व्यवसाय
sakal

बोलून बातमी शोधा

Rajshekhar Reddy Silam

सक्सेस स्टोरी : सेंद्रिय शेतीतून उभा केला व्यवसाय

sakal_logo
By
सुवर्णा येनपुरे-कामठे

राजशेखर रेड्डी सीलम यांच्या वडिलांना १९९९ मध्ये कर्करोग झाला. यामुळे दुःखी असल्याने राजशेखर यांनी वडिलांच्या कर्करोगाचे कारण शोधण्याकडे लक्ष देण्याचे ठरविले. त्यावेळी त्यांना असे कळले, की यामागील एक कारण म्हणजे भेसळयुक्त पदार्थ खाणे, हे आहे. शेतीतील अभ्यासावर पदवी मिळविलेल्या राजशेखर यांना शेतात रसायनांचा वापर करून गावातील नागरिकांचा कर्जबाजारीपणा वाढत आहे, हे लक्षात आले. त्यावेळी त्यांनी विषारी रसायनांपासून मुक्त सेंद्रिय खाद्यपदार्थ ब्रँड तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, २००४ मध्ये त्यांनी हैदराबादमध्ये ‘श्रेष्टा नॅचरल बायोप्रॉडक्ट्स प्रा. लि.’अंतर्गत ‘२४ मंत्र ऑर्गेनिक’ ब्रँड बाजारात आणला. यापूर्वी त्यांनी १९८८ आणि २००० च्या दरम्यान भारतातील सर्वांत मोठ्या कंपन्यांसोबत काम केले होते, ज्यामुळे हे क्षेत्र त्यांना समजण्यास सोपे गेले. (Success Story Rajshekhar Reddy Silam Business raised from organic farming)

वयाच्या ४० व्या वर्षी व्यवसाय सुरू करण्याचा राजशेखर यांचा प्रवास सोपा नव्हता. त्यांना सेंद्रिय वस्तू तयार करणाऱ्‍या शेतकऱ्‍यांची गरज होती, पण त्यांना विश्‍वासात घेणे कठीण काम होते. कीटकनाशके आणि सिंथेटिक खते विकत घेण्यासाठी शेतकऱ्‍यांना कर्ज घ्यावे लागत होते, त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनावर आणि स्थिरतेवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत होता. यासाठीच पारंपारिक शेतीकडून सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांना वळविणे आव्हानात्मक काम होते. मात्र, रसायनांच्या वापरामुळे ढासळत असलेल्या त्यांच्या मातीचा पोत दाखवून ते शेतकऱ्‍यांना खात्रीने पटवून देऊ शकले. कंपनीने त्यांना चांगल्या उपजीविकेचे आश्वासन देखील दिले. ‘२४ मंत्र ऑर्गेनिक’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक एन. बालासुब्रमण्यम (बाला) असा दावा करतात, की ‘२४ मंत्र ऑर्गेनिक’ ब्रँडमार्फत शेतकरी त्यांच्या उत्पन्नापेक्षा १० ते २० टक्के अधिक कमावतात. बाला सांगतात, की आमच्या ब्रँडचे प्रॉडक्ट दरमहा भारतातील दहा लाखांहून अधिक ग्राहक खरेदी करीत आहेत, तर सुमारे ५० देशांमधील १० लाखांहून अधिक लोकांना सेंद्रिय खाद्यान्न पाठविले आहे.

कंपनीने राजस्थान, आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र आदी १५ राज्यांमध्ये ४५,००० शेतकऱ्‍यांचा समुदाय बनविला आहे. त्यांच्या २,२५,००० एकर शेतीत उत्पादन घेतले जाते. ‘श्रेष्ठा नॅचरल बायोप्रॉडक्ट्स प्रा. लि.’च्या अंतर्गत २०० उत्पादने तयार केली जातात. कंपनीची वार्षिक उलाढाल १०० कोटींहून अधिक रुपयांची आहे. यापैकी ६० कोटी रुपयांची उलाढाल ही बाहेरील देशांमध्ये असलेल्या मागणीसाठीची आहे.

loading image
go to top