डांगे यांच्या यकृतदानातून युवकाला जीवनदान

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

जो दुसऱ्यांसाठी जगला तोच खरे जगला, असे म्हणतात. पण काही माणसे आपल्या मृत्यूनंतरही दुसऱ्यांसाठी जगतात. उपराजधानीत हा अनुभव गुरुवारी झालेल्या अवयवदानातून आला. ६३ वर्षीय निवृत्त कर्मचारी सुधीर डांगे यांच्या यकृत दानातून ४३ वर्षीय युवकाला जीवनदान मिळाले.

नागपूर - जो दुसऱ्यांसाठी जगला तोच खरे जगला, असे म्हणतात. पण काही माणसे आपल्या मृत्यूनंतरही दुसऱ्यांसाठी जगतात. उपराजधानीत हा अनुभव गुरुवारी झालेल्या अवयवदानातून आला. ६३ वर्षीय निवृत्त कर्मचारी सुधीर डांगे यांच्या यकृत दानातून ४३ वर्षीय युवकाला जीवनदान मिळाले.

न्यू इरा हॉस्पिटलमध्ये यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. जगाचा निरोप घेताना त्यांनी इतरांच्या जीवनात प्रकाश पेरला. अवयवदानातून नातेवाइकांनी समाजाला आदर्श घालून दिला आहे. उपराजधानीत यकृतदानातून आतापर्यंत २४ जणांचे प्राण वाचले आहेत. 

आयुधनिर्माणीतून निवृत्त झालेले सुधीर डांगे यांचा ८ जुलै रोजी अंबाझरी बायपास रोडवर अपघात झाला. त्यांना तत्काळ न्यूरान हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले. त्यांच्या मेंदूला दुखापत झाली होती.

न्यूरान येथील डॉक्‍टरांनी डांगे यांचा जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु दोन दिवसांच्या उपचारानंतर त्यांचे शरीर उपचाराला दाद देत नसल्याचे डॉक्‍टरांना कळले. त्यांनी नातेवाइकांनी तशी माहिती दिली. 

१० जुलै रोजी त्यांना न्यू इरा हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. येथे मेंदूपेशी मृत्यू पावल्याचे निदानातून पुढे आले. त्यांच्या जगण्याची शक्‍यता मावळळी. कुटुंबीय हादरून गेले. मेंदूरोगतज्ज्ञ डॉ. नीलेश अग्रवाल, ह्रदयरोगतज्ज्ञ डॉ. आनंद संचेती, डॉ. अश्‍विनी चौधरी, शुभम राऊत यांनी डांगे यांच्या नातेवाइकांना संपूर्ण माहिती दिली. दरम्यान, अवयवदानासंदर्भात विचारणा केली. 

डांगे यांची पत्नी स्मिता डांगे, मुलगी स्वाती गोंधळेकर (पॅथॉलॉजिस्ट), प्रा. गौरव गोंधळेकर यांचे समुपदेशन केले. नातेवाइकांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. नातेवाइकांनी तयारी दाखवल्यानंतर विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीच्या अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी आणि सचिव डॉ. रवी वानखेडे यांच्यासह विभागीय समन्वयक वीणा वाठोरे यांना सूचना दिली. 

वाठोरे यांनी प्रतीक्षा यादी तपासली. दरम्यान, नागपुरातील ४३ वर्षीय युवक यकृताच्या प्रतीक्षेत असल्याचे निदर्शनास आले. तत्काळ प्रत्यारोपणाची तयारी केली. यकृत प्रत्यारोपणतज्ज्ञ डॉ. राहुल सक्‍सेना, डॉ. साहिल बंसल, डॉ. मुरली चौधरी, डॉ. सविता जयस्वाल यांच्या पथकाने यकृत प्रत्यारोपण यशस्वी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sudhir Dange Liver Donate Youth Life Saving Motivation Humanity