esakal | सक्सेस स्टोरी : कोरोनाकाळात उभा केला अडीच कोटींचा व्यवसाय
sakal

बोलून बातमी शोधा

Saumya Kabra

सक्सेस स्टोरी : कोरोनाकाळात उभा केला अडीच कोटींचा व्यवसाय

sakal_logo
By
सुवर्णा येनपुरे-कामठे

गेल्या वर्षी कोरोनाकाळात अर्थव्यवस्था जवळपास कोलमडलीच होती. याचा परिणाम अनेक व्यवसायांवर झाला आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात कर्मचारीकपातही करण्यात आली. अशा वेळी कोणीतरी नवा व्यवसाय उभा करू पाहात होते, त्या व्यवसायाचे नाव म्हणजे ‘कन्फेट्टी गिफ्ट्स’!

सौम्या काब्रा या २३ वर्षीय तरूणीने हा व्यवसाय जयपूर येथे फेब्रुवारी २०२० मध्ये सुरू केला. कोरोनाकाळात व्यक्तीगत भेटीऐवजी डिजिटलायजेशनला अधिक महत्त्व प्राप्त झाले. यामुळे प्रत्यक्ष संपर्क न येताही काम होत असल्याने या काळात डिजिटलायजेशन मोठ्या प्रमाणात वाढले. याचाच फायदा सौम्या हिने घेतला.

सौम्या हिने ब्रिटनच्या मॅंचेस्टर विद्यापीठातून एमबीएचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती जानेवारी २०१९ मध्ये भारतात आली. भारतात आल्यानंतर तिला आपल्या काही मित्र-मैत्रणींना भेटवस्तू पाठवायच्या होत्या. त्यासाठी ती ऑनलाइन भेटवस्तूंच्या शोधात होती. त्यावेळी तिला अशी एकही भेटवस्तू देणारे वेबपोर्टल सापडले नाही, जे भेटवस्तू पाठवणाऱ्याच्या भावना समजून घेऊ शकेल.

ती म्हणते, की त्यावेळी उपलब्ध भेटवस्तूंचे पर्याय खूप मूलभूत होते आणि त्यांना खरोखरच भेटवस्तू पाठवणाऱ्यांच्या वैयक्तिक भावनांची पर्वा नव्हती. तसेच त्यातील वैविध्यही खूपच मर्यादित होते.

उद्योजक बनण्याच्या विचारात असलेल्या सौम्या हिने या क्षेत्रात उतरण्याची हीच योग्य वेळ असल्याचे ओळखले. त्यानंतर स्वतःजवळ असलेल्या ५० हजार रुपयांचा भांडवल म्हणून वापर करीत तिने या व्यवसायाला सुरवात केली. कॉर्पोरेट गिफ्ट देण्यापासून तिने सुरवात केली. त्यानंतर ‘बी टू सी’मध्ये स्वतःचे अस्तित्व निर्माण केले.

सौम्या म्हणते, ‘आम्ही तयार केलेले गिफ्ट्स हे व्यक्तीगत स्वरूपाचे असतात. त्यामध्ये व्यक्तीच्या भावनांना अधिक महत्त्व दिले जाते. चहाप्रेमी असणाऱ्या एखाद्या व्यक्तीसाठी आम्ही चहाप्रेम असणाऱ्या वस्तूंपासून एक बॉक्स तयार करतो. असेच कॉफीप्रेमींसाठी लागू होते.’

कंपनी तीन टप्प्यांमध्ये काम करते. यामध्ये गिफ्ट बॉक्स निवडणे, गिफ्ट निवडणे आणि त्यानंतर त्याला साजेशे ग्रिटींग कार्ड निवडणे या टप्प्यांचा समावेश आहे.

एका गिफ्ट बॉक्सची किंमत साधारणतः एक हजार ते तीन हजार रुपयांपर्यंत आहे. कॉर्पोरेट गिफ्ट्स पुरवताना इतर कंपन्या मेलद्वारे गिफ्टची मागणी पाठवतात. त्यानंतर प्रश्नवालीच्या माध्यमातून कोणत्या प्रकारचे गिफ्ट्स पाठवता येतील, यावर विचार केला जातो आणि त्याप्रमाणे कंपन्यांना गिफ्ट्सचा पुरवठा केला जातो.

कोरोनाच्या कठीण काळातही कंपनीची उलाढाल वर्षभरातच ५० हजारांवरून २.५ कोटी रुपयांवर गेली आहे.

loading image