भोसऱ्यात पाणीदार चळवळीला बळ 

राजेंद्र शिंदे
शनिवार, 20 मे 2017

भोसरे हे गाव राजकीयदृष्ट्या सर्वपक्षीय असले, तरी जलसंधारणाच्या कामांसाठी आम्ही सगळे एक झालो, हाच आमच्या दृष्टीने प्लस पॉंईट आहे. आता खऱ्या अर्थाने आम्ही एकवटलो आहोत. आता एकच ध्यास तो म्हणजे गावचा विकास. 

- विश्वास गुजर, तहसीलदार 

खटाव - भोसरेचे (ता. खटाव) सुपुत्र तहसीलदार विश्वास गुजर यांनी पुढाकार घेतल्याने या गावाने पाणीदार चळवळीत आघाडी घेतली आहे. ग्रामस्थांनी लोकवर्गणीसह श्रमदान केल्याने भोसऱ्यामध्ये जलसंधारणाची अनेक कामे उभी राहू लागली आहेत. या चळवळीत विश्‍वास गुजर हे गावकऱ्यांसाठी रोल मॉडेल ठरले आहेत. 

खटाव, माणवासीयांना उन्हाळ्यात पाण्यासाठी दाहीदिशा भटकावे लागते. लोणी, भोसरे, अंभेरी, जाखणगाव, विसापूर व आजूबाजूला वाड्या-वस्त्यांना कालव्याने पाणी येण्याची आशाही नाही. त्यामुळे आशेवर न बसता स्वतःलाच पाण्याची व्यवस्था करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्याप्रमाणे जाखणगावमध्ये जलसंधारणीा कामे झाली. आता भोसरेतदेखील पाणीदार गाव करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दर वर्षी गुजर हे ग्रामदैवताची यात्रा व सरसेनापतींच्या जयंतीसाठी येत होते. या वर्षी त्यांनी गावात ग्रामसभा बोलावली. ग्रामस्थांसमोर पाण्याचा प्रश्न मांडला. या भागात भौगोलिक स्थितीमुळे कालवा येणे कठीण आहे, ही वस्तुस्थिती त्यांनी मांडली व आपल्यालाच पाण्याची सोय केल्याशिवाय पर्याय नसल्याचे पटवून दिले. जलसंधारणाची कामे हाती घेण्यासाठी त्यांनी 50 दिवसांची सुट्टी घेतली. त्याचबरोबर पाच लाख रुपयांची देणगीही दिली. त्यानंतर प्रत्येकाने कुवतीप्रमाणे मदतीची तयारी दाखवली. 15 लाख रुपये जमा झाले. हळूहळू गावातील विविध ट्रस्ट, मंडळांनीदेखील मदत करण्याचा मानस व्यक्त केला. गावातील 15 ट्रॅक्‍टर मालकांची संघटना आहे. त्यांनी केवळ डिझेलवर काम करण्याची तयारी दर्शविली. आज गावात जलसंधारणाच्या बाबतीत क्रांती झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tahsildar took the initiative and led the movement to the vibrant movement