
वेल्हे तालुक्यातील अतिदुर्गम चांदर गावाच्या ‘टाके वस्ती३’ या वाडीत पिण्याचे पाणी थेट अंगणापर्यंत पोचवून ग्रामस्थांची तहान भागविण्याचे काम पुण्यातील युवकांनी नुकतेच पूर्ण केले.
पाणी पोचवून भागवली ग्रामस्थांची तहान; पुण्यातील युवकांचा उपक्रम
मार्केट यार्ड - वेल्हे तालुक्यातील अतिदुर्गम चांदर गावाच्या ‘टाके वस्ती३’ या वाडीत पिण्याचे पाणी थेट अंगणापर्यंत पोचवून ग्रामस्थांची तहान भागविण्याचे काम पुण्यातील युवकांनी नुकतेच पूर्ण केले. यावेळी या गावात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्याबरोबरच, ग्रामस्थांना अन्नधान्य व पाण्याच्या हांड्यांचे वाटपही करण्यात आले.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
दुर्गम भागातील ग्रामस्थांच्या मदतीसाठी नंदकुमार जाधव मित्र परिवाराच्या पुढाकाराने सातत्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. चांदर गावात वीज आल्यापासून वेगाने सुविधा उपलब्ध होत आहेत. या गावातील टाकेवस्ती येथे लोकसहभागातून पाण्याची टाकी व पाइपलाइनचे काम यापूर्वीच झाले होते. मात्र, टाकीपर्यंत पाणी पोचविण्यासाठी वीज पंपाची सोय नव्हती. सहकारनगर लायन्स क्लबचे डॉ. प्रसाद खंडागळे यांनी स्वखर्चातून वीजपंप उपलब्ध करून दिला. हा पंप सार्वजनिक विहिरीवर बसवून टाकीपर्यंत पाणी पोचविण्यात आले.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
उपलब्ध झालेले हे पाणी घरापर्यंत वाहून नेण्यासाठी अनिकेत कोंढाळकर यांनी वाढदिवसाचे निमित्ताने महिलांना स्टीलचे हांडे भेट दिले. डॉ. किरण हिंगे यांनी स्वखर्चाने सुमारे शंभर लोकांसाठी आरोग्य शिबिर घेत मोफत औषधे उपलब्ध करून दिली. तसेच ओंकार मित्र मंडळाच्या वतीने गुलाब निवंगुणे व अक्षय आहेर यांनी अन्नधान्याचे वाटप केले. रवींद्र पठारे, प्रसाद चिकणे, सुरेश मांदळे, किरण राहूरकर यांनी कार्यक्रम यशस्वी केला.
Edited By - Prashant Patil