मानेगावचा तलाव भरला अन्‌ टंचाई पळाली

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

तनिष्कांच्या प्रयत्नांना यश; ‘सकाळ‘च्या मदतीने काढला होता गाळ

तळमावले - उन्हाळा आला की पाटण तालुक्‍यातील मानेगावला पाणीटंचाईची झळ कायमच असायची. महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागायची. तनिष्कांचा गट स्थापन झाला आणि मानेगावातील पाणीटंचाई दूर होण्यासाठी तनिष्कांच्या प्रयत्नांना यश आले. ‘सकाळ रिलीफ फंडा’च्या मदतीने गाळ काढल्यानंतर मानेगावचा तलाव आता पूर्ण क्षमतेने भरला असून, गावाची टंचाईतून सुटका होण्यास मदत होणार आहे.   

मानेगावच्या तनिष्का व्यासपीठाच्या सदस्यांनी या तलावातील गाळ काढण्याची मागणी केल्यावर ‘सकाळ’ने सकारात्मक भूमिका घेत या कामासाठी मदत करण्याची भूमिका घेतली. ‘सकाळ रिलीफ फंडा’तून उपलब्ध केलेल्या दोन लाख रुपयांच्या निधीतून गावातील ग्रामपंचायतीजवळ असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरीजवळील तलावातील गाळ काढण्यात आला. तनिष्कांनी पुढाकार घेतल्यामुळे ग्रामस्थांनी श्रमदान करून आपला वाटा उचलला. परिसराचे सुशोभिकरणही झाले. पावसाळ्यात तलाव भरल्यामुळे परिसरच रम्य बनून गेला. या तलावातील पाणी आता दीर्घकाळ टिकणार असल्याने गावची टंचाईची स्थिती दूर होण्यास मदत होणार आहे. बोअरवेलच्या पाणीपातळीत वाढ होणार असून, जनावरांना पिण्यासाठी पाणी वापरता येणार आहे. 

तलाव पावसाच्या पाण्याने पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे. ‘सकाळ रिलीफ फंडा’च्या माध्यमातून तनिष्कांच्या पुढाकारातून अनेक ठिकाणी जलसंधारणाची कामे केली जात होती. त्याचाच एक भाग म्हणून ‘सकाळ’ने तलावातील गाळ काढला. त्याचाच परिणाम म्हणून तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने गावकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. गावातील लोकांच्या मदतीने या तलावाची स्वच्छता करण्यात आली. त्यामध्ये तनिष्का सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन या विधायक कामाला जोड दिल्याने तनिष्का सदस्यांचे ग्रामस्थ कौतुक करत आहेत.  

सकाळ रिलीफ फंडातून ४९ कामे
तनिष्कांच्या मागणीनुसार ‘सकाळ रिलीफ फंडा’च्या वतीने आतापर्यंत ४९ तलाव किंवा बंधाऱ्यातून गाळ काढण्याची कामे जिल्ह्यात करण्यात येऊन गावांचा पाणीप्रश्‍न सुटण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे विविध गावांत गावकऱ्यांच्या एकजुटीतून जलसंधारणाच्या कामांना गती मिळण्यास मदत झाली आहे. गाळ काढण्याच्या कामांसाठी जिल्ह्यात आतापर्यंत ९६ लाख रुपयांचा निधी ‘सकाळ रिलीफ फंडा’मार्फत उपलब्ध करून देण्यात आला आहे.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: talmavale news manegav lake full water