#SaturdayMotivation : कहाणी कऱ्हाडच्या एका ध्येयवेड्या शिक्षिकेची...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जून 2019

विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणे, हाच केवळ उद्देश ठेवून काम केले. भावासाठी मी जे काही केले, ती माझी कौटुंबिक बाब आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, याची काळजी वाटत होती. त्यामुळे त्याची माहिती कोणालाच दिली नाही. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशामुळे अधिक आनंद झाला आहे. तो अधिक वृद्धिंगत होण्यासाठी येथून पुढेही प्रयत्न करणार आहे.
- सुशीला जाधव, शिक्षिका, पालिका शाळा क्रमांक तीन

कऱ्हाड - आपल्या प्रकृतीची चिंता न करता येथील पालिका शाळा क्रमांक तीनमधील शिक्षिका सुशीला अजित जाधव यांनी आपल्या सहकारी शिक्षकांसमवेत ज्ञानदानाचे कर्तव्य पार पाडल्याने शाळेतील दहा विद्यार्थी पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीमध्ये झळकले आहेत. शिष्यवृत्तीच्या निकालामध्ये जाधव यांचा सिंहाचा वाटा असल्याचे त्यांचे सहकारी शिक्षकही मान्य करतात. 

सुशीला जाधव यांचे पारगाव-खंडाळा मूळगाव आहे. मात्र, २२ वर्षांपूर्वी त्या येथे स्थायिक झाल्या. प्रारंभी पालिकेच्या शाळा क्रमांक नऊमध्ये त्या शिक्षिका म्हणून रूजू झाल्या. पाच वर्षांपूर्वी त्यांची शाळा क्रमांक तीनमध्ये बदली झाली. त्यावेळी त्यांच्याकडे अत्यंत चांगल्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. काल लागलेल्या निकालातही त्यांचा सिंहाचा वाटा आहे. जाधव यांनी चांगले प्रयत्न केल्याने शाळेला चांगले यश मिळाले, असे त्यांचे सहकारी मानतात. शाळा क्रमांक तीनमधील जाधव यांनी कर्तव्य म्हणून शिकवले आहे. मात्र, त्यांनी स्वतःचा त्रास लपवून विद्यार्थ्यांना केलेल्या ज्ञानदानाची सध्या चर्चा आहे. जाधव यांनी त्यांची किडनी भावाला दिली आहे. त्या शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला. मात्र, त्याचा कसलाही विचार न करता त्यांनी विद्यार्थ्यांना बारा-बारा तास शिकवले. त्याचा परिणाम शिष्यवृत्तीच्या निकालात दिसला आहे. शाळेत त्या सकाळी साडेसातला येत होत्या. दिवसभर शाळेच्या कामकाजाबरोबर त्यांनी शिष्यवृत्तीचेही क्‍लास घेतले. जादा शिक्षणाचीही जबाबदारी स्वीकारली. व्यक्ती प्रकृती चांगली असली तरी अशी कामे स्वीकारताना मागे-पुढे पाहतो. मात्र, जाधव यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना यशस्वी करण्याचे ध्येय स्वीकारले होते. 

त्याच ध्येयाच्या वेडाने त्यांनी काम केले. अखेर त्यांचा ‘रिझल्ट’ शिष्यवृत्तीच्या निकालात दिसलाही. पालिका शाळा क्रमांक तीनचे दहा विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या गुणवत्ता यादीत झळकले. त्यात जाधव यांचा सिंहाचा वाटा आहेच. मात्र, त्यांना साथ देणाऱ्या त्यांच्या शाळेतील मुख्याध्यापक अर्जुन कोळी, पर्यवेक्षक संग्राम गाढवे, सहशिक्षिका ऊर्मिला माने, अजितराव भोसले, दादासाहेब वायदंडे यांनीही त्यांच्या बरोबरीने काम केले. जाधव यांनी भावाला किडनी दिली आहे, ही गोष्ट खास करून शाळा, सहकारी शिक्षक व पालकांनाही सांगितली नव्हती. कौटुंबिक गोष्ट आहे, ती कशाला सांगा, इतक्‍या स्वच्छ मनाने त्यांनी ती गोष्ट सांगण्यास टाळले होते. मात्र, ज्या दिवशी त्यांचे गुपित कळाले, त्यावेळी त्यांच्या सोबतच्या शिक्षक सहकाऱ्यांनाही त्यांचा अभिमान वाटला. त्यांच्या कामाचे कौतुक केले. जाधव यांनी प्रकृतीची चिंता न करता ज्ञानदानाचे काम केल्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी होवू शकलो, अशी प्रतिक्रिया मुख्याध्यापक अर्जुन कोळी यांनी व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teacher Sushila Jadhav Education Motivation