छत्र हरपलेल्या भावडांना "श्रृतिका फंड'ने उभारी 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 December 2019

कऱ्हाडमधील सद्‌गुरू गाडगे महाराज प्राथमिक शाळेत शिक्षण घेत असलेल्या मुलांचे अचानक वडील मरण पावतात. त्यामुळे त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण हाेताे, परंतु दोघांनाही मोफत शिक्षणाबरोबरच दप्तरापासून सर्व शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी सर्वांनी घेतलेला पूढाकार आदर्शवत ठरत आहे.

कऱ्हाड ः वडिलांच्या निधनाने छत्र हरपलेल्या श्रृतिका आणि यशच्या शिक्षणासाठी "श्रृतिका फंड' ने हातभार लावला आहे. विद्यानगरातील सद्‌गुरू गाडगे महाराज प्राथमिक शाळेने "श्रृतिका फंड" गोळा करण्याचा मानस केला. त्यात मुलांनी खाऊसाठी मिळणारे पैसे, वाढदिवस रद्द करून जमा झालेली रक्कम दिली. शिक्षकांनीही त्याला आर्थिक हातभार लावला. त्यातून दोन दिवसांत साडेआठ हजारांचा "श्रृतिका फंड' उभा राहिला. त्यातून या भावंडांच्या शिक्षणासाठी नवा प्रकाश मिळणार आहे.

सकाळची वाचकसंख्या वाढली तब्बल 11.89 लाखांनी!

विद्यानगर-सैदापूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या सद्‌गुरू गाडगे महाराज प्राथमिक विद्यामंदिरात श्रृतिका राजेंद्र चव्हाण ही इयत्ता पाचवीमध्ये शिकते. घरची परिस्थिती अत्यंत बेताची. श्रृतिका अभ्यासात हुशार असल्यामुळे मोलमजुरी करणारे श्रृतिकाचे वडील तिला शिक्षणासाठी सर्वार्थाने पाठबळ देत. शाळा शिकून जिल्हाधिकारी होण्याचे तिचे स्वप्न आहे. यावर्षी पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा, जवाहर नवोदय विद्यालय आदी स्पर्धा परीक्षांची ती तयारीही करत आहे. शिष्यवृत्तीच्या पहिल्या सराव परीक्षेत श्रृतिकाने वर्गात प्रथम क्रमांक पटकावल्यावर तिच्या वडिलांनी शाळेत पेढे वाटले होते. मुलगी चांगल्यारितीने शिकत असल्यामुळे त्यांना तिचा अभिमान होता.
 

भविष्याचे स्वप्न रंगवताना राजेंद्र चव्हाण यांना श्रुतिका आपली परिस्थिती पालटवेल, असा विश्वास होता. मात्र, श्रुतिकाच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले. वडिलांच्या आजारपणातील औषधोपचारावर झालेल्या खर्चामुळे चव्हाण कुटुंबावर सुमारे दोन लाखांचे कर्ज झाले. त्यामुळे श्रृतिकाच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. श्रृतिकाचा लहान भाऊ यश हा ही त्याच शाळेत दुसरीत शिकतो. आर्थिक परिस्थितीमुळे दोन्ही भावंडांच्या शिक्षणात खंड पडू शकतो, हे शाळेने ओळखले.

जरुरु वाचा - कोसळलेलं आयुष्य पेलताना..!

कर्मवीर अण्णांच्या फंडाप्रमाणे मुख्याध्यापिका सुनीता जाधव, वर्गशिक्षक अमोल कोळेकर, जगदीश खांडेकर, शिक्षक सहकाऱ्यांनी श्रृतिकाच्या पुढील शिक्षणासाठी "श्रृतिका फंड' उभा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सद्‌गुरू गाडगे महाराज प्राथमिक शाळेने पुढाकार घेत श्रुतिका फंड गोळा केला. त्यात कोणी खाऊसाठी मिळणारे पैसे, कोणी वाढदिवस रद्द करून त्याची रक्कम दिली. शिक्षकांनीही भरीव अशी आर्थिक मदत केली. कोपर्डे हवेलीतून ज्या रिक्षातून श्रुतिका शाळेत ये-जा करते, त्या रिक्षावाल्यांनीही आर्थिक हातभार लावला आहे. त्यामुळे अवघ्या दोन दिवसांत सुमारे साडेआठ हजारांचा श्रृतिका फंड उभा राहिला.
 
 

श्रुतिका व यश जोपर्यंत सद्‌गुरू गाडगे महाराज प्राथमिक शाळेत शिक्षण घेत आहेत, तोपर्यंत त्या दोघांनाही मोफत शिक्षणाबरोबरच दप्तरापासून सर्व शैक्षणिक साहित्य उपलब्ध करू दिले जाईल.
- सुनीता जाधव, मुख्याध्यापिका 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teachers And Students Collected Fund For The Education Of Shrutika Chavan