कोसळलेलं आयुष्य पेलताना..! 

कोसळलेलं आयुष्य पेलताना..! 

ह्याद्रीच्या पर्वत रांगेत विसावलेल्या जगप्रसिद्ध पाचगणी या पर्यटनस्थळी माझा जन्म झाला. आई- वडील, बहीण- भाऊ आणि मी असे पाच जणांचे आमचे कुटुंब. वडील मिशनरी शाळेत तुटपुंज्या मेहनतानावर राबत असे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पुरेसे पैसे मिळत नसतं. त्यामुळे ते बेकरीतही काम करत. वडिलांची ही धडपड आईला स्वस्थ बसू देत नसे. त्यामुळे ती शिलाई मशिनवर कापडी पिशव्या शिवून द्यायची. डझनामागे तिला दहा बारा रुपये मिळायचे. या दोघांच्या कष्टातून मग आमच्या कुटुंबाचा गाडा हाकला जायचा.

हेही वाचा - टॅक्‍सी चालकाचा प्रामाणिकपणा, 13 लाख केले परत
 
शालेय शिक्षणालाही इथंच सुरवात झाली. सहावीपर्यंत आई, वडील शाळेत सोडायला आणि न्यायला यायचे. अभ्यासासाठी ते अधूनमधून टोकाचा आग्रह धरायचे. त्यामुळे मी कधीच कुठल्या इयत्तेत अडखळली नाही. दहावीपर्यंतचा प्रवास वेगाने झाला. आधीच लहान वयात शाळेत घातलेलं. त्यामुळे नासमज वय असतानाच महाविद्यालयाची पायरी चढावी लागली.
 
आईवडिलांचा संसार जेमतेमच; पण सारं काही छान वाटत होतं. सुरळीत चाललेलं होतं. अशात घरी पाहुणे यायला लागले आणि माझ्या लग्नाचा विचार सुरू झाला. शिकण्याच्या वयातच ऍरेंज मॅरेज झाले. शिक्षणाला ब्रेक लागला. मग गोंधळलेलं मन काही सूचू देईना. धाडसाने ठामपणे काही बोलायची हिंमतही होईना; पण पती खूपच समंजस मिळाले. त्यांनीही आई वडिलांइतकाच लळा लावला. नवनवीन हिंदी- मराठी गाणी ऐकवून मला खूश ठेवण्याचा कसोशीने ते प्रयत्न करू लागले. रोमॅंटिक वातावरणात मला आईवडिलांची यादही फार तीव्रतेने येत नसायची. आयुष्यातला सर्वोच्च हर्षोत्सव दुसरा असू शकत नाही, असंच काहीसं वाटत होतं; परंतु तो फारकाळ टिकला नाही.

नक्की वाचा - चिमुरडी उभारतेय माणुसकीची भिंत

सहजीवन, संसार, आयुष्य याचे अर्थ उमलण्याआधीच भविष्य कोमेजून गेले. पतीचे अल्पशा आजाराने निधन झाले. पायाखालची जमीन सरकली. हजारो विंचवांनी एकाच वेळी डंख मारावेत इतक्‍या वेदना मनाला होऊ लागल्या आणि माझे अवघे आयुष्य कोसळले. स्वतःला सावरणं कठीण जात होतं. अश्रू ढाळून ढाळून अक्षरशः मी हतबल झाले.
 
कोसळलेल्या आयुष्याचं सारं भविष्य अंधारून गेलं. अशा भयाण परिस्थितीत वडील मात्र पहाडासारखे खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिले. खचू दिले नाही आणि एकटेही पडू दिले नाही. पती आता राहिले नसले, तरी पिता आहेत याची जाणीव करून देत त्यांनी मायेने मला घरी आणले.

दरम्यान, काही दिवसांतच मला दुसऱ्या लग्नासाठी स्थळं येऊ लागली. या वेळी मात्र वडिलांना कदाचित लक्षात आले असावे, की मुलीचे वय शिकण्याचे आहे. लग्नाचे नाही. त्यामुळे तेही इतर कोणाचा आग्रह मान्य करत नव्हते; पण स्थळं येतच होती आणि मी हतबल होत होते.
 
इथून पुढच्या माझ्या आयुष्याचे काय हा प्रश्न मला सतावत होता. कोणत्या दिशेने जायचे, आयुष्य कसे पेलायचे याचा खूप विचार करत होते. तेव्हा, मी शिकले पाहिजे असं वाटू लागले. शिकले तर पुढे काहीतरी मार्ग सापडेल असंही मनात येऊ लागले. त्यामुळे मला शिकायचे आहे असं मी वडिलांना सांगून टाकले. त्याक्षणी वडिलांचे डोळे पाण्याने भरले आणि त्या भरल्या डोळ्यांनीच हसत हसत त्यांनी सहमती दर्शवली. पती निधनाचं एवढं अफाट दुःख आपली ही पोरं पचवेल का? तिला हे सारं सहन होईल का किंवा या दुःखाच्या भयावह गर्तेतून ती बाहेर पडेल का, असं कदाचित माझ्या वडिलांना वाटले असावे; परंतु मी या साऱ्या दुःखातून शिकण्याचे धाडस दाखवतेय याचंच वडिलांना अपार कौतुक वाटले. म्हणूनच भरल्या डोळ्यांनी त्यांनी पुढील शिक्षणासाठी मला समर्थन देऊ केले. मग मी सुद्धा शिकण्याचा निर्धार आणखी पक्का केला.

जरुर वाचा - त्यांनी झिडकारले; पोलिसाने कवटाळले !

पाचगणीच्या मीनलबेन मेहता महाविद्यालयातून ग्रॅज्युएट झाले. एमए समाजशास्त्र करण्यासाठी मग पुढचा स्ट्रगल सुरू झाला तो महानगरीत अर्थात मुंबईत. मुंबई विद्यापीठात मला समाजशास्त्र विभागात प्रवेश मिळाला. या विभागातर्फे वसतिगृहाची सुविधा मिळाली आणि ब्रेक लागलेलं शिक्षण पुन्हा स्टार्ट झालं. या विभागात असणारे व इथे भेटलेले सर्वच प्रोफेसर यांचे योग्य मार्गदर्शन मिळत राहिले. इथल्या वातावरणामुळे केवळ माझ्या जाणिवा उन्नत झाल्या नाहीत तर नेणिवेच्या पातळीवरही प्रगल्भता येऊ लागली. इथे शिकविल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या विषयांमुळे आपल्या अवतीभवती नेमक्‍या कोणत्या सामाजिक, सांस्कृतिक समस्या आहेत याचं अचूक आकलन झालं.
 
एव्हाना, माझं दुःख मी केव्हाच बाजूला सारले. एमएनंतर एमएसडब्ल्यू आणि एमफिल हातावेगळे केले. सफाई कामगारांच्या मुलांचे शिक्षण यावर एमएसडब्ल्यूला असताना विशेष अभ्यास केला. एमफिल करताना स्त्रीवादी चळवळीवर संशोधन केले. हे करताना नेटसुद्धा झाले. यथावकाश आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा महिलांच्या प्रश्नांवर पीएच.डी.साठी पुढे सरसावले आणि मुंबई विद्यापीठात असिस्टंट प्रोफेसरही झाले. 
आजही स्थळं येतात तेव्हा वडील त्यांना सांगत असतात मुलगी शिकत आहे, नंतर बघू. कदाचित त्यांना याची जाणीव होऊन गेली असावी, की आयुष्यात शिक्षण किती महत्त्वाचे आहे ते.
 
एकूण या प्रवासात स्वतःच्या आयुष्याला कोसळू न देता ते पेलून कसे धरायचे याचा एक जिवंत अनुभव माझा मलाच समृद्ध करून गेला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com