तेजसच्या अवयवदानातून चौघांना जीवदान 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

पुणे - दहावीच्या परीक्षेनंतर सुटीसाठी मामाच्या गावाला गेलेला तेजस आईला आणण्यासाठी म्हणून घराबाहेर पडला तो परतलाच नाही; पण त्याच्या शरीरातील अवयवांमुळे त्याने नव्या रूपात जन्म घेतल्याची भावना त्याच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर दिसत होती. 

दुचाकीवरून तोल गेल्याने तेजसच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली. त्याची मृत्यूशी चाललेली 48 तासांची झुंज अपयशी ठरली. हे जग सोडत असताना मात्र, त्याने चौघांना जीवदान दिले. 

तेजस लोखंडे याने दहावीची परीक्षा दिली होती. तो कर्जत येथे राहत होता. वर्षभर अभ्यास केल्याने सुटीत त्याला वेगवेगळ्या नातेवाइकांच्या घरी जायचे होते. त्यामुळे तेजस त्याच्या मामाकडे मांडवगड (जि. नगर) येथे आला होता. त्याची आई जवळच्या गावातील नातेवाइकांकडे गेली होती. तिला आणण्यासाठी तेजस सकाळी सात वाजता मामाच्या घरून दुचाकी घेऊन बाहेर पडला. जेमतेम दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात जात असताना दुचाकीवरून त्याचा तोल गेला. त्या अपघातात त्याच्या डोक्‍याला मार लागला. तेथील लोकांनी रुग्णवाहिका बोलावून त्याला तातडीने नगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथून पुढे पुण्यातील खासगी रुग्णालयात आणि नंतर ससून रुग्णालयात हलविले. 

ससून रुग्णालयात शुक्रवारी (ता. 4) दाखल करण्यात आल्यानंतर तेजस अत्यवस्थ होता. त्याचे प्राण वाचविण्यासाठी प्रभावी उपचार करण्यात आले; पण त्याचे शरीर त्याला प्रतिसाद देत नव्हते. अखेर त्याच्या मेंदूचे कार्य थांबले. त्यामुळे डॉक्‍टरांनी तेजसला "ब्रेन डेड' घोषित केले. डॉक्‍टरांनी केलेल्या अवयवदानाच्या आवाहनाला तेजसच्या कुटुंबीयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे तेजसचे हृदय, यकृत आणि मूत्रपिंड दान करण्यात आले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tejas organ donation give Life to four