esakal | दहा मुलींचे स्वीकारले शैक्षणिक पालकत्व
sakal

बोलून बातमी शोधा

education

आर्थिक परिस्थितीमुळे अनेकवेळा मुलींना शिकता येत नाही, शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागते. अशा मुलींना चिंतामणी रात्र प्रशालेतून शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्राचार्य सतीश वाघमारे यांनी ‘दत्तक पालक योजना’ सुरू केली. योजनेत लायन्स क्‍लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्‍टने सहभाग घेत तब्बल दहा मुलींचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले, त्यामुळे सावित्रीच्या लेकींच्या शिक्षणाचा मार्ग सुकर झाला आहे. 

दहा मुलींचे स्वीकारले शैक्षणिक पालकत्व

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - आर्थिक परिस्थितीमुळे अनेकवेळा मुलींना शिकता येत नाही, शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागते. अशा मुलींना चिंतामणी रात्र प्रशालेतून शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्राचार्य सतीश वाघमारे यांनी ‘दत्तक पालक योजना’ सुरू केली. योजनेत लायन्स क्‍लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्‍टने सहभाग घेत तब्बल दहा मुलींचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले, त्यामुळे सावित्रीच्या लेकींच्या शिक्षणाचा मार्ग सुकर झाला आहे. 

चिंचवड स्टेशन येथील चिंतामणी रात्र प्रशालेत यंदा पन्नास टक्‍क्‍यांहून अधिक मुलींनी प्रवेश घेतला आहे. गेल्या वर्षी दहावी व बारावीतही मुलींनी बाजी मारली आहे. घरच्या बिकट परिस्थितीमुळे दिवसभर काम करायचे आणि रात्र प्रशालेतून शिक्षण पूर्ण करण्यासाठी मुलींनी प्रवेश घेतला; परंतु पुस्तक खरेदीसाठीही पुरेसे पैसे नसल्याचे प्राचार्य वाघमारे यांच्या लक्षात आले. त्यावर त्यांनी ‘दत्तक पालक योजने’चा प्रस्ताव लायन्स क्‍लबकडे मांडला. या प्रस्तावाला लायन्स सभासदांनी हिरवा कंदील दाखवीत रेशम लोहारकर, कविता किवळेकर, ज्योती राठोड, श्‍वेता जाधव, ललिता आवटे, वैशाली जाधव, अलिफा पठाण, सिद्धी गोडलकर, सोनाली चव्हाण आणि आशा आवटे या अकरावी व बारावीच्या विद्यार्थिनींना दत्तक घेऊन त्यांचे शैक्षणिक पालकत्व घेतले.  

या प्रशालेत लायन्स क्‍लब इंटरनॅशनलच्या कौशल्य विकास प्रकल्पांतर्गत लायन्स क्‍लब ऑफ पूना निगडी व प्रेरणा कौशल्य विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विविध विषयांतील तज्ज्ञांद्वारे रोजगारातील संधी व स्वयंरोजगारासाठी प्रेरित करण्यात येते. दैनंदिन व्यवहारातील गणित, मोजमाप पद्धती, इलेक्‍ट्रिकल फिटिंग्स, गिफ्ट आर्टिकल्स, वाहनांची रचना व त्यांचे कार्य, इंजिनिअरिंग ड्रॉइंग वाचणे, कॉम्प्युटरचा क्रियाशील वापर, ब्यूटिपार्लर याविषयीचे धडे दिले जात आहेत. 

...अन ऋण फेडले
गरीब घरच्या मुलींचे शैक्षणिक पालकत्व घेतल्याबद्दल रात्र प्रशालेचे प्राचार्य सतीश वाघमारे यांनी लायन्स क्‍लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्‍ट ३२३४ डी २ चे प्रांतपाल ओमप्रकाश पेठे, ‘चिंतामणी’चे अध्यक्ष चंद्रशेखर बोरकर व क्‍लबच्या अध्यक्षा सविता निंबाळकर यांच्या हस्ते कांतिलाल मुनोत, अशोक सातपुते, अशोक येवले, उषा येवले, विजय आगरवाल, संगीता आगरवाल, प्रवीण पाटील, हरण पाटील, ज्ञानेश्‍वर दाणी, ज्योती दाणी, नितीन कराबले, सुजित पटेल, अशोक म्हस्के, मंदार नाटेकर, सुनीता मधुरे, कामिनी शर्मा, फिरोज मुजावर, सुरेश पाचारणे यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविले.  

रात्र प्रशालेत असे उपक्रम नेहमीच राबविले जावेत, त्यामुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्यांना शाळेत प्रवेश घेण्याची प्रेरणा मिळेल.
- चंद्रशेखर बोरकर,  अध्यक्ष, चिंतामणी प्रशाला 

loading image