शिरूरमधील १५ आदिवासी कुटुंबांना मोफत घरे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मे 2019

गेल्या वर्षी आमदाबाद येथे ४ घरे देण्यात आली होती. या वर्षी तेथे ३५ घरे बांधण्याचा निश्‍चय आहे. आदिवासी समाजातील लोकांचा चेहऱ्यावरील समाधान पाहिल्यावर आनंद झाला. त्यांच्यासाठी संस्थांनी पुढाकार घ्यावा. 
- दीपक नथानी, संस्थापक-अध्यक्ष, रेलफोर कंपनी

टाकळी हाजी - नथानी कुटुंबाच्या पुढाकारातून कवठे येमाई (ता. शिरूर) येथील हिलाळ वस्तीवर राहणाऱ्या १५ आदिवासी कुटुंबांना रेलफोर कंपनीमार्फत स्लॅबची मोफत घरे बांधून देण्यात आली.

दरम्यान, शिरूर तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात मोठ्या प्रमाणात भिल्ल व आदिवासी समाज झोपड्या करून राहतात. कवठे येमाई येथे हिलाळ वस्तीजवळ देखील ठाकर समाजाची वस्ती आहे. घोड नदीच्या किनारी झोपड्या करून हे आदिवासी नागरिक राहतात. मागील वर्षी म्हाळोबाचे तळे या ठिकाणी रेलफोर कंपनीच्या माध्यमातून तलाव खोलीकरण करण्यात आले. या तळ्याच्या लोकार्पण सोहळ्यासाठी या कंपनीचे मालक दीपक नथानी व त्यांचा परिवार या ठिकाणी आला होता. त्या वेळी त्यांनी या ठाकर वस्तीची पाहणी केली होती. या कुटुंबांना राहण्यासाठी घर नसल्याचे त्यांच्या निर्दशनास आले.

मातोश्री पुष्पा नथानी यांनी ठाकर समाजाची विचारपूस करून या लोकांना स्वखर्चातून १५ घरे बांधून देण्याचे ठरविले. त्यानुसार रेलफोर कंपनीच्या माध्यमातून या वर्षी येथे १५ स्लॅबची घरे बांधण्यात आली. या घरांचा लोकार्पण सोहळा नुकताच झाला. 

या वेळी रेलफोर कंपनीचे मालक दीपक नथानी, शिना नथानी, नितीन घोडके, पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे, आमदाबादचे सरपंच योगेश थोरात, वसंत पडवळ, सुदाम इचके, अरुण मुंजाळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

कंपनीच्या माध्यमातून आम्हाला निवारा उपलब्ध झाला आहे. कोणतीही कागदपत्रे न घेता ही वास्तू मिळाल्याने आनंद झाला आहे. भटकंती करत असल्याने कागदपत्रे नाहीत; पण आम्हाला जातीचे दाखले मिळण्यासाठी मदत करावी. 
- पोपट जाधव, घरकुल लाभार्थी

Web Title: Tribal Family Free Home by Railfor Company Motivation