आजीच्या उत्तरकार्याला नातवंडांनी वाटली तुळशीची रोपे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जुलै 2019

आजीच्या आठवणी चिरंतन राहाव्यात, यासाठी तिच्या उत्तरकार्याला आम्ही तुळशीची रोपे वाटण्याचा निर्णय घेतला. पर्यावरण संवर्धनासाठीही तुळशीचे रोप महत्त्वाचे असल्याने आम्ही उत्तरकार्यात नातेवाईकांना तुळशीचे रोप दिले.
- ऋषीकेश घोरपडे

कोल्हापूर - हल्ली उत्तरकार्याला भांडी वाटपाची नवी पद्धत सुरू झाली आहे. पै पाहुणे, नातेवाईक, मित्रमंडळींना भांडी साहित्य दिले जाते. मात्र, अनेकवेळा हा आर्थिक खर्च सामान्य कुटुंबीयांना परवडणारा नसतो. उत्तरकार्यादिवशी होणाऱ्या या अनाठायी खर्चाला पायबंद बसला पाहिजे, चुकीच्या प्रथा पडू नयेत यासाठी उत्तरकार्यादिवशी भांडी वाटपाला फाटा देत पर्यावरण संवर्धनाचा वसा घेत तुळशीची रोपे भेट देण्याचा विधायक उपक्रम संभाजीनगर येथील साळुंखे कुटुंबीयांनी राबविला. यासाठी नातवंडांनी पुढाकार घेतला. 

संभाजीनगर येथील कंठाबाई साळुंखे यांचे २२ जूनला निधन झाले. त्यानंतर त्यांच्या नातवंडांनी पुढाकार घेत उत्तरकार्याला तुळशीची रोपे वाटण्याचा निर्णय घेतला. त्याला घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींनीही पाठिंबा दिला. बुधवारी (ता. ३) त्यांचे उत्तरकार्य झाले. या वेळी येणाऱ्या नातेवाईकांना, पै पाहुण्यांना तुळशीची १०१ रोपे भेट देण्यात आली. 

तुळशीचे रोप हे २४ तास ऑक्‍सिजनचा पुरवठा करते. आजीच्या आठवणी या तुळशीच्या रूपाने चिरंतन राहोत, यासाठी नातवंडांनी तुळशीचे रोप वाटले. शरद जाधव, अजय जाधव, किमया देसाई-केसरकर, ऋषीकेश घोरपडे, वीरेंद्र देसाई, ऋतुराज सरनोबत, तेजश्री सरनोबत-वरपे, शर्वरी सरनोबत-निंबाळकर या नातवंडांनी हा उपक्रम राबविला. तसेच अनाथाश्रमात अन्नदानही केले.

आजीच्या आठवणी चिरंतन राहाव्यात, यासाठी तिच्या उत्तरकार्याला आम्ही तुळशीची रोपे वाटण्याचा निर्णय घेतला. पर्यावरण संवर्धनासाठीही तुळशीचे रोप महत्त्वाचे असल्याने आम्ही उत्तरकार्यात नातेवाईकांना तुळशीचे रोप दिले.
- ऋषीकेश घोरपडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tulsi basil seedlings distributed by grandson