इच्छाशक्तीतून बांधले स्वतःचे घर!

जगन्नाथ माळी
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

घर आपले आहे, ही भावना मनात असल्याने ते मजबूत बांधण्याचा प्रयत्न आहे. वाळू पाण्यात धुऊन बांधकामासाठी वापरली आहे. घरामध्ये सर्व सोयी-सुविधा निर्माण केल्या आहेत. या कामात पत्नीचे सहकार्य मिळत आहे. 
- सुभाष शिंदे, उंडाळे

उंडाळे - दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर माणूस काय करू शकतो, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे येथील सुभाष शिंदे आणि ते स्वतः बांधकाम करत असलेले त्यांचे घर. इतर घरांची बांधकामे पाहून आपलं घर स्वतः बांधण्याचे शिवधनुष्य त्यांनी उचललंय आणि यशस्वी पेललही.

सुभाष शिंदे मूळचे सरुड (जि. कोल्हापूर) येथील. त्यांचे लग्न येथील शोभा कदम यांच्याशी झाले. पत्नी ग्रामसेविका असल्याने व त्यांची नोकरीही याच परिसरात असल्याने शिंदेही येथेच स्थायिक झाले. त्यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. कोणत्याही गोष्टींचे निरीक्षण करणे आणि चिकित्सक वृत्तीतून ते सतत विविध प्रयोग करतात. ते सर्पमित्रही आहेत. येथे स्थायिक झाल्याने त्यांनी घर बांधण्याचे ठरवले. त्यासाठी शेवाळेवाडीनजीक घरासाठी जागाही खरेदी केली. आता घर बांधायचे आहे, तर ते स्वतः का बांधू नये, असा प्रश्‍न त्यांना पडला. चिकित्सक वृत्तीतून त्यांनी विविध ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामांना भेटी दिल्या. बांधकामातील बारकावे समजून घेतले. इंजिनिअर, कारागिरांची गरज नाही. हे स्वतः मी करू शकतो, असा आत्मविश्‍वास आल्याने त्यांनी स्वतःच घर बांधण्याचा निर्णय घेतला. पूर्वी कोणताही अनुभव नसताना त्यांनी हे धाडस केले आणि डिसेंबर २०१६ मध्ये घराचा पाया खोदून बांधकामास प्रारंभ केला. तळात बीम टाकून त्यावर काँक्रीट बांधकामास प्रारंभ केला. स्टील, वाळू, खडी, सिमेंटच्या साह्याने एक हजार स्क्वेअर फूट बांधकाम केले असून इमारतीचा तळमजला पूर्ण झाला आहे. 

इतर घरांची बांधकामे चौकटी व खिडक्‍यांजवळ वीट बांधकामामुळे तडकतात. त्यामुळे त्यांनी इमारतीच्या बांधकामात कुठेही वीट वापरलेली नाही. भिंतीही स्टीलच्या साह्याने सिमेंट काँक्रिटमध्ये बांधल्या आहेत. फक्त मजुरांकडून स्लॅब टाकून घेतला आहे. सध्या दुसऱ्या मजल्याचे काम सुरू केले असून साहित्य वर न्यायला त्यांनी स्वतः लाईटविना चालणारी मिनी क्रेनही तयार केली आहे. 

फक्त एक मजूर हाताखाली घेऊन त्यांचा हा प्रयोग पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: undale news western maharashtra news success story subhash shinde