ग्रामस्थांकडून सरकारच्या मदतीशिवाय १८ हजार झाडांचे संवर्धन

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 5 March 2020

पूर्व हवेलीतील अष्टापुरात पर्यावरणाचे महत्त्व ओळखून ग्रामस्थांनी कोणत्याही शासकीय मदतीविना सुमारे अठरा हजार झाडांचे रोपण व संवर्धन करून हरितग्रामची संकल्पना सत्यात आणली आहे.

केसनंद - पूर्व हवेलीतील अष्टापुरात पर्यावरणाचे महत्त्व ओळखून ग्रामस्थांनी कोणत्याही शासकीय मदतीविना सुमारे अठरा हजार झाडांचे रोपण व संवर्धन करून हरितग्रामची संकल्पना सत्यात आणली आहे. येथील फळझाडांच्या उत्पन्नातून गावातील ग्रामस्थांना करमुक्त करण्याचा ग्रामपंचायतीचा संकल्प आहे.

ताज्या बातम्यांसाठी करा ई-सकाळचे ऍप 

अष्टापूर ग्रामस्थांनी गावात विकासकामांसह शाळाही आदर्श व सुसज्ज केली आहे. दुष्काळी व प्रतिकूल परिस्थितीत अष्टापूर ग्रामस्थांनी प्रसंगी ठिबक सिंचन व श्रमदानातून १८ हजार झाडांची वनराई करून पर्यावरण जपले आहे. गावातील रस्ते, शाळा, सार्वजनिक ठिकाणे, तसेच माळरानावरही झाडे लावल्याने गाव परिसर हिरवाईने नटलेला दिसत आहे. फळाफुलांच्या झाडांबरोबरच वड, चिंच व करंज अशा मोठ्या झाडांचाही यांत समावेश असल्याने गावात ग्रामस्थांना विसाव्यासाठी ठिकठिकाणी सावलीही उपलब्ध झाली आहे. गावात प्रत्येक घरापुढे झाड आहे. दशक्रिया विधीही वनराईच्या सावलीत होतो.

उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार ॲड. अशोक पवार, माजी आमदार बाबूराव पाचर्णे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामस्थ दरवर्षी वृक्षारोपण करतात. गेल्या दहा वर्षांपासून ही वृक्षलागवड अठरा हजारांवर गेल्याचे माजी पंचायत समिती सदस्य सुभाष जगताप यांनी सांगितले.

पुण्यात सॅनिटायजर, हॅंडग्लोजचा खप दोनशे पटीने वाढला

‘कोणी फिरकले नाही’
मोठ्या प्रमाणावर केलेली वृक्षलागवड पाहण्यासाठी अथवा ग्रामस्थांचे कौतुक करण्यासाठी कोणीही अधिकारी वा पदाधिकारी फिरकला नसल्याची खंत ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. सरकारने गायरान हद्द मोजून कायम करून दिल्यास तेथेही वृक्षलागवड करण्याची ग्रामस्थांची तयारी आहे.

करमुक्तीचा ग्रामस्थांचा संकल्प
सुमारे साडेतीन हजार लोकसंख्येच्या अष्टापूर ग्रामपंचायतीत अकरा सदस्य आहेत. ग्रामपंचायत आय.एस.ओ. मानांकित व संगणकीकृत कारभार असून, सुसज्ज ग्रामपंचायत इमारत, नळ पाणीपुरवठा, रस्ते, सुसज्ज शाळा, अंगणवाड्या, कॉम्प्युटर लॅब, अशा सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत. मात्र, गावाला घरपट्टीतून मिळणारे उत्पन्न अडीच लाख आहे. गावात चिंच, करंज, सीताफळ, नारळ यांसह अनेक फळझाडांची लागवड करण्यात आली आहे. दरवर्षी या झाडांचे उत्पन्न वाढत असून, नजीकच्या काळात फळांच्या उत्पन्नातून ग्रामस्थांना कर सवलत देण्याचा ग्रामपंचायतीचा संकल्प आहे. त्यासाठी माजी पंचायत समिती सदस्य सुभाष जगताप, जिल्हा परिषद सदस्या कल्पना जगताप, सरपंच आत्माराम कोतवाल, उपसरपंच रुक्‍मिणी कोतवाल व आजी माजी पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: villagers 18 thousand trees Conservation