जमादाराचा मुलगा झाला सहाय्यक समादेशक

मंगेश शेवाळकर
शनिवार, 30 जून 2018

हिंगोली येथील रहिवासी असलेले विष्णू पहारे यांचे प्राथमिक शिक्षण शहरातील मानिक स्मारक अरे विद्यालयात झाले आहे. त्यानंतर आदर्श महाविद्यालयात बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी नाशिक येथील के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयातून केमिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली.

हिंगोली : येथील पोलिस जमादार सुखदेव पहारे यांचा मुलगा विष्णू सुखदेव पहारे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविले असून त्याची सेंट्रल पोलीस फोर्स येथे सहाय्यक समादेशक म्हणून निवड झाली आहे.

हिंगोली येथील रहिवासी असलेले विष्णू पहारे यांचे प्राथमिक शिक्षण शहरातील मानिक स्मारक अरे विद्यालयात झाले आहे. त्यानंतर आदर्श महाविद्यालयात बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी नाशिक येथील के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयातून केमिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. मात्र ही पदवी घेऊन त्यांचे नोकरीमध्ये मन रमत नव्हते. लहानपणापासूनच खाकी वर्दीचे आकर्षण असलेल्या विष्णू पहारे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगले होते. त्यासाठी नागपूर येथे दोन वर्षापासून त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास सुरू केला होता. कुठल्याही परिस्थितीमध्ये अधिकारी व्हायचे या ध्येयाने झपाटलेल्या विष्णू पहारे यांनी 24 तास अभ्यास सुरू केला.

जुलै 2017 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे चित्र दिसू लागले होते. लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मैदानी चाचणी मुलाखतीमध्ये कस लागणार असल्यामुळे त्यांनी मैदानी चाचणी च्या सरावा सोबतच इतर मित्रांसोबत गट चर्चा करून मुलाखतीला कसे सामोरे जायचे हे तंत्र अवगत करून घेतले. त्यांच्या मित्रांनीही वेळोवेळी त्यांची मुलाखत घेण्यासाठी वेळ दिला. डिसेंबर महिन्यात मैदानी चाचणी मध्ये मैदान मारल्यानंतर त्यांची मुलाखत झाली. या परीक्षेचा निकाल शुक्रवारी तारीख 29 जाहीर झाला असून सेंट्रल पोलीस फोर्स मध्ये सहाय्यक समादेशक या पदावर निवड झालेल्या 170 उमेदवारांमध्ये विष्णू पहारे यांचा 163 वा क्रमांक आहे. या निकालाची माहिती त्यांच्या घरी कळाल्यानंतर श्री. पहारे कुटुंबियांना आकाश ठेंगणे झाले होते. जिद्द व परिश्रमात सोबतच ध्येय निश्चिती करून  मार्गक्रमण केल्यास यश निश्चितच मिळते हे विष्णू पहारे यांनी दाखवून दिले आहे. त्यांच्या यशाचे हिंगोली शहरातून कौतुक केली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vishnu Pahare Success story