‘चंपाबेन’मध्‍ये उभारली ‘माणुसकीची भिंत’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 मार्च 2019

सांगली - विविध सामाजिक उपक्रम राबवण्याच्या उद्देशाने श्रीमती चंपाबेन बालचंद शाह महाविद्यालयातर्फे ‘माणुसकीची भिंत’ हा अनोखा उपक्रम शहरात राबविण्यात आला. परिसरातील नागरिकांकडून जुने कपडे संकलन करून ते गरजूंपर्यंत पोहचवण्यात आले.

सांगली - विविध सामाजिक उपक्रम राबवण्याच्या उद्देशाने श्रीमती चंपाबेन बालचंद शाह महाविद्यालयातर्फे ‘माणुसकीची भिंत’ हा अनोखा उपक्रम शहरात राबविण्यात आला. परिसरातील नागरिकांकडून जुने कपडे संकलन करून ते गरजूंपर्यंत पोहचवण्यात आले. माजी विद्यार्थिनींनी हा पुढाकार घेतला. ‘माणुसकीची भिंत’ उपक्रमाचा लाभ मिळालेल्‍यांच्‍या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. 

आजही आपल्या समाजात दान देण्याची व दान स्वीकारण्याची उदात्त परंपरा आहे. या परंपरेचा आदर्श घेत चंपाबने महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थीनींनी हा उपक्रमास सुरूवात केली. कपडे व इतर वापरण्यायोग्य साहित्य जमा करून ज्याला याची गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहचवण्यासाठी ही ‘माणुसकीची भिंत’ उभारण्यात आली. जमा केलेल्या वस्तू व कपडे एकत्र करून ज्याला गरज आहे त्यांनी घेऊन जाणे, असा संदेश परिसरात पोहचवण्यात आला. परिसरातील गोरगरिबांनी याचा लाभ घेण्यासाठी ‘माणुसकीच्या भिंती’कडे धाव घेतली. जोपर्यंत देणारे-घेणारे आहेत तोपर्यंत ही माणुसकीची भिंत अशीच पुढे सुरू राहणार आहे, असे विद्यार्थिनींनी सांगितले.

गरजू विद्यार्थींनींना माजी विद्यार्थीनी संघटनेमार्फत मोफत बसचे पास देणे, एक वर्षासाठी सायकल वापरण्यास देणे आदी उपक्रम राबवतो. आत्तापर्यंत 47 सायकलींची बँक तयार झाली आहे. तसेच विद्यार्थींनीना विवाहपूर्व समुपदेशन सुद्धा देण्यात येेते. 

-  रोहिणी आपटे

श्री. जोशी यांनी उपक्रमाचे कौतुक करत, समाजातील गरजूंना मदतीचा हात नेहमीच पुढे केला पाहिजे. माजी विद्यार्थीनींनी हाती घेतलेल्या उपक्रमाचा आदर्श आजी विद्यार्थीनींनीही घ्यावा. यासाठी ‘सकाळ’चा नेहमीचा पाठिंबा असेल, असे सांगितले. प्राचार्य डॉ. पी. आर. पवार यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी उपक्रमाविषयीही माहिती दिली. 

यावेळी गुजराती सेवा समाजचे अध्यक्ष कांतीभाई वामजा, सचिव दीपकभाई शाह, उपाध्यक्ष मुकेश पटेल, सदस्य ललीत संग्राम, स्वप्निल शाह, प्रसाद शाह, अरुण शेठ उपस्थित होते. एस. ए. ओतारी यांनी सूत्रसंचालन केले. एस. एस. दुर्गुळे यांनी आभार मानले. यिनचे समन्वय विवेक पवार आणि सदस्यही उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wall of humanity in Champaben Shah college