वॉलहॅंगिंगची कला पोचणार सातासमुद्रापार!

श्रीनिवास दुध्याल
Monday, 18 November 2019

जर्मनीतील प्रदर्शनात होणार सहभागी
जानेवारी २०२० मध्ये जर्मनी येथे विविध वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या प्रदर्शनात श्री. अंकम सहभागी होणार आहेत. तसेच मार्च महिन्यापर्यंत विविध प्रकारचे वॉलहॅंगिंग विणून एप्रिल महिन्यापासून त्याच्या मार्केटिंगला सुरवात करणार असल्याचे श्री. अंकम यांनी सांगितले.

सोलापूर - वॉलहॅंगिंग... हस्तकलेतील ही जादुई विणकामाची कला... सोलापुरातून लोप पावत असलेल्या या कलेचा सातासमुद्रापार प्रसार करण्यासाठी येथील वॉलहॅंगिंग कलाकार राजेंद्र अंकम हे धागा-धागा विणून विविध देशांतील राष्ट्राध्यक्षांचे पोर्ट्रेट बनवून त्या-त्या राष्ट्राध्यक्षांना भेट देणार आहेत. यामुळे सोलापुरातील या वॉलहॅंगिंगच्या कलेला ऊर्जितावस्था मिळण्याची आशा श्री. अंकम यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली. 

येथील प्रा. गणेश चन्ना यांना दिल्ली येथील जागतिक दहशतवाद विरोधी मंचतर्फे अमेरिकेत होणाऱ्या चर्चासत्रात सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. या चर्चासत्रास अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येणार आहेत. त्या वेळी प्रा. चन्ना हे ट्रम्प यांना त्यांचे पोर्ट्रेट भेट देणार आहेत. 

येथील वॉलहॅंगिंगमधील पोर्ट्रेटला मोठी मागणी होती. मात्र, डिजिटल युगात मागणी कमी होत गेल्याने सोलापुरातील सात-आठ वॉलहॅंगिंगच्या मोठ्या कार्यशाळा बंद पडल्या. आता दोन-तीन पोर्ट्रेट कलाकारच शहरात शिल्लक आहेत. उर्वरित १५ ते २० कलाकार कटवर्क, फिगर्स व अन्य शोभेच्या वस्तू बनवून आपला उदरनिर्वाह करत आहेत. मात्र, डिजिटल युगातही हस्तकला उद्योगाला चालना देण्यासाठी जगातील विविध देश हस्तकलेतील उत्पादनांची मागणी करत असताना, सोलापुरातील वॉलहॅंगिंगलाही चांगले दिवस येतील, या उद्देशाने श्री. अंकम यांनी जगभरात या कलेचा प्रसार करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. 

यांचे विणले पोर्ट्रेट
श्री. अंकम हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, संयुक्त रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासह जर्मनी, ऑस्ट्रेलिया आदी देशांच्या राष्ट्राध्यक्षांचे पोर्ट्रेट विणत आहेत. या नेत्यांना प्रत्यक्ष भेटून किंवा त्या-त्या देशांतील राजदूतांमार्फत हे पोर्ट्रेट दिले जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पोर्ट्रेटही त्यांना नुकतेच त्यांनी भेट म्हणून दिले. श्री. मोदी यांनी या कलेची आत्मियतेने स्तुती केली होती. आता स्मृती इराणी, अमित शहा, प्रकाश जावडेकर, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, सुशीलकुमार शिंदे, शरद पवार, सचिन तेंडुलकर, भारतातील प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा,  मित्तल, अदानी, अंबानी आदींचे पोर्ट्रेट विणून त्यांना प्रत्यक्षात भेट देण्याचे नियोजन श्री. अंकम यांनी केले आहे.

विदेशी नागरिकांत हस्तकलेविषयी आत्मियता वाटते, त्यामुळे वॉलहॅंगिंगला जगात मोठे मार्केट मिळू शकते. भारतीय नागरिकांनी या कलेविषयी प्रेम दाखविल्यास प्रोत्साहन मिळेल. सोलापुरातील कलाकारांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळेल. नवीन कलाकार घडतील.
- राजेंद्र अंकम, वॉलहॅंगिंग विणकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wallhanging art reach to international level rajendra ankam