१०२ कुटुंबांनी फुलवली कचऱ्यातून ‘हिरवळ’

प्रज्ञा चिटणीस
गुरुवार, 10 जानेवारी 2019

सांगली -  कचराकोंडीने शहरांचा श्‍वास गुदमरतोय. आधुनिक जीवनशैलीचा अंगिकार करत असताना कचऱ्याच्या रूपाने त्याचे दुष्परिणामही सोबतीला येताहेत. माणसाच्या निरोगी जगण्यावरच उठलेला कचरा संपवायचा कसा हा सर्वांना भेडसावणारा प्रश्‍न. प्रज्ञा चिटणीस यांच्या हिरवळ ग्रुपने त्यावर उपाय शोधले. या उपक्रमात तब्बल सांगली-मिरजेतील तब्बल १०२ कुटुंबे सहभागी झाली आहेत.

रेड्युस, रियुज आणि रिसायकल या त्रिसूत्रीचा अंगिकार करीत कचऱ्याची कमीत कमी निर्मिती हीच कचरामुक्तीची सुरुवात ठरते. कितीही प्रयत्न केले तरी बाहेरचा कचरा कोणत्या ना कोणत्या रुपाने घरात येतोच. तो कचऱ्याच्या रुपात बाहेर जाणार नाही याची काळजी घेणे मात्र आपल्याच हातात आहे. चार सदस्यांचे एक कुटुंब दररोज किमान एक किलो कचरानिर्मिती करते. परसबागा फुलवण्याच्या हेतूने तयार झालेल्या हिरवळ ग्रुपने कचऱ्यावर मंथन सुरू केले. तो घरातच रुजवायचे ठरवले. त्यातून खतनिर्मितीची संकल्पना प्रत्यक्षात आली. ओला व सुका कचरा वेगवेगळा केला. सुका कचरा जसे कि कागद, प्लास्टीक, लोखंड, पत्रा व काच भंगारवाल्याच्या हवाली केले.

स्वयंपाकघरातील शिल्लक अन्न, फळांचे अवशेष असा ओला कचरा कंपोस्ट खतात परिवर्तीत केला.  परसात छोटे खड्डे तयार केले; काहींनी डब्यातच खताचा छोटा प्लॅन्ट बनवला. कचऱ्याच्या विघटनासाठी कल्चर वापरले. जीवाणू टिकण्यासाठी ओलावा राहील याची काळजी घेतली. ओला कचरा, त्यावर कल्चर किंवा मोठ्या झाडाखालची माती असे एकावर एक थर दिले. ते अधूनमधून ढवळत राहिल्याने जीवाणूंना प्राणवायू मिळतो. सहा आठवड्यात उत्तम खत तयार होते. 

मुंग्यांच्या बंदोबस्तासाठी पावडर वापरली. दुर्गंधी टाळण्यासाठी कागदाचे कपटे टाकले. खताच्या गुणवत्तेसाठी प्रसंगी शेणखत, युरीया, सुपरफॉस्फेट मिसळले. आता कमी जागेत खतनिर्मिती करुन उत्तम परसबागा फुलवल्या आहेत. आम्ही या उपक्रमाचे प्रदर्शनही भरवतो. त्यासाठीही स्वागत आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Waste management by Hirval Group Sangli