पाणीदार गावासाठी भावंडांचे श्रमदान

फिरोज तांबोळी
गुरुवार, 17 मे 2018

गोंदवले - स्वतःला गुठांभर जमीन नसतानाही गोंदवले खुर्द (ता. माण) येथील बहीण-भाऊ गावचा दुष्काळ हद्दपार करण्यासाठी जिद्दीने पेटून उठले आहेत.

गोंदवले - स्वतःला गुठांभर जमीन नसतानाही गोंदवले खुर्द (ता. माण) येथील बहीण-भाऊ गावचा दुष्काळ हद्दपार करण्यासाठी जिद्दीने पेटून उठले आहेत.

पाणी अडविण्यासाठी उन्हाळ्याची सुटी श्रमदानात घालवून परिसर पाणीदार करण्यासाठी रोहित व रक्षिता हे गोंदवल्याच्या माळरानावर घाम गाळत आहेत.
श्रमदानातून जलसंधारणाच्या उपक्रमापासून दूर असलेल्या गोंदवले खुर्दमध्ये १६ वर्षीय अवलिया १३ वर्षीय बहिणीच्या मदतीने भविष्यातील पाण्याच्या संकटाला पळवू पाहत आहे. अकरावीची परीक्षा दिलेल्या रोहित शंकर बनसोडे याने उन्हाळ्याच्या सुटीत मौजमजा करण्यात वेळ न घालवता पाण्यासाठी कामाला सुरवात केली. रोहितने जलसंधारणाच्या ध्वनीचित्रफित पाहिल्यानंतर आपणही गावासाठी अशी कामे करू शकतो, असे ठरविले. उन्हाळ्याची सुटी सुरू होताच त्याने हातात फावडे व घरीच बनविलेली कुदळ घेतली व माळरानावर काम सुरू केले. वन विभागाच्या हद्दीतील माळावरील टेकडीवर समतल चरी काढल्या. कुटुंबीयांनीही त्याला प्रोत्साहन दिले. भर उन्हात पाण्यासाठी भाऊ एकटाच राबतोय हे पाहून धाकटी बहीण रक्षिताही (वय १३) त्याच्या मदतीला धावली. हे दोघेही बहीण-भाऊ सकाळी तीन व सायंकाळी दोन तास श्रमदान करतात. माळरानावर महिनाभरात ३५ हून अधिक समतल चर झाल्या आहेत. मुलांना हवी ती मदत करण्यास वडील शंकर बनसोडेही तयार आहेत.

दुष्काळी स्थिती अनुभवली असल्याने भविष्यात ही दशा बदलण्याच्या उद्देशाने मी नेहमीच जलसंधारणाच्या कामासाठी अग्रेसर राहीन.
- रोहित बनसोडे, गोंदवले खुर्द

रोहितदादाने सुरू केलेल्या जलसंधारणाच्या कामात मी हातभार लावून गाव पाणीदार करण्यासाठी अखेरपर्यंत प्रयत्न करेन.
- रक्षिता बनसोडे, गोंदवले खुर्द


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water village rohit and rakshita Labor donations motivation