खडकाळ माळरानावर घेतले कलिंगडाचे आंतरपीक

सयाजी शेळके
बुधवार, 24 एप्रिल 2019

थेट विक्री करणार
सध्या कलिंगड काढणीच्या अवस्थेत असून, सुमारे २० टनांपर्यंत उत्पादन मिळण्याची त्यांना आशा आहे. या सर्व कलिंगडाची विक्री थेट ग्राहकांना करण्याचा मानस आहे. त्यामुळे कमी दरात चांगले कलिंगड खाण्याची मेजवानी ग्राहकांना मिळणार आहे. शिवाय सेंद्रिय खताचा वापर असल्याने मागणी वाढणार असून चार पैसे जास्तीचे पदरात पडतील, अशी अपेक्षा लक्ष्मण पाटील यांनी व्यक्त केली.

उस्मानाबाद - खडकाळ माळरानावर जेसीबीच्या साह्याने चर मारून आंबा पिकात कलिंगडाचे आंतरपीक घेण्याची किमया सांगवी-काटी (ता. तुळजापूर) येथील शेतकरी लक्ष्मण पाटील यांनी साधली आहे. विशेष म्हणजे तीन एकरांवरील सर्व आंतरपीक सेंद्रिय पद्धतीने केले असून ग्राहकांना थेट विक्री करण्याचा निर्णय पाटील यांनी केला आहे.

काटी-सांगवी येथील शेतकरी लक्ष्मण पाटील यांच्याकडे आठ एकर शेती आहे. १९७२ या वर्षात लक्ष्मण जेमतेम तिसरीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर काही वर्षे त्यांनी मुंबईत जाऊन गवंडीकाम केले. २००६ मध्ये त्यांनी पुन्हा गाव गाठले. शेतालगत तलाव झाला. त्यामुळे विहीर खोदाई केली. सध्या विहिरीला पुरेसे पाणी आहे. तिसरी उत्तीर्ण असले, तरी त्यांना लिहिता येत नाही; मात्र वाचन चांगले करतात. ॲग्रोवन दैनिकाचे ते नियमित वाचक आहेत. यातूनच त्यांना आंबा पिकात कलिंगड लागवडीचा पर्याय सुचला. 

गेल्या वर्षी ऑक्‍टोबर महिन्यात दहा बाय पाच अंतरावर आंब्याची लागवड केली. त्यानंतर यंदा फेब्रुवारी महिन्यात आंतरपीक म्हणून कलिंगडाची लागवड केली आहे. जमीन खडकाळ असल्याने लागवड करताना जेसीबीने चर मारावी लागली. त्यानंतर मल्चिंग करून ठिबकच्या साहाय्याने कलिंगड लागवड केली.

सुरवातीपासून कलिंगड पिकाला रासायनिक खत वापरले नाही. गांडूळ खतासह इतर जैविक खतांचा वापर केला आहे. त्यामुळे कलिंगडावर किडीचा प्रादुर्भाव कमी झाला. परिणामी औषध फवारणीही मर्यादेत राहिली. जास्तीचा खर्च झाला नाही. सध्या कलिंगड काढणीच्या अवस्थेत आहे. चार दिवसांत तोडणी सुरू होणार आहे. विशेष म्हणजे पत्नी विमल यांच्यासह स्वतः लक्ष्मण शेतात मेहनत करतात. जास्तीचे मजूरही लावत नाहीत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Watermelon Agriculture Success Motivation Vimal Laxman Patil