esakal | #WednesdayMotivation: गरज ओळखा आणि यशस्वी व्हा!
sakal

बोलून बातमी शोधा

business woman

आजच्या धकाधकीच्या जीवनात पालक आणि मुले यांच्यातील अंतर वाढत चालले आहे. या सगळ्यांची दखल घेत मोनिका कुलकर्णी यांनी यासाठी काम करण्याचा निर्णय घेतला आहे. यातूनच ‘आजोळ’ने जन्म घेतला.

#WednesdayMotivation: गरज ओळखा आणि यशस्वी व्हा!

sakal_logo
By
मोनिका कुलकर्णी

मोनिका कुलकर्णी,  संस्थापक संचालक, आजोळ डे केअर सेंटर

आजची मुले ही उद्याचे नेतृत्व आहेत. मुलांना पर्यावरणाच्या जवळ आणून नागरिक म्हणून त्यांच्या भूमिकेविषयी आणि जबाबदारीबद्दल त्यांना जागरूक करणे, ही आजची गरज आहे. तसेच, आजच्या धकाधकीच्या जीवनात पालक आणि मुले यांच्यातील अंतर वाढत चालले आहे. या सगळ्यांची दखल घेत मोनिका कुलकर्णी यांनी यासाठी काम करण्याचा निर्णय घेतला आहे. यातूनच ‘आजोळ’ने जन्म घेतला.

बालपण हा जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. जो आपल्याबरोबर सर्वांत प्रेमळ व्यक्ती आणि प्रेमळ आठवणी घेऊन येतो आणि आयुष्यभर त्या आठवणी आपल्याबरोबर कायम राहतात. बालपणातील हेच निर्णायक दिवस त्या मुलांच्या भविष्यातील वाटचालीचे चित्र स्पष्ट करते. प्रत्येक मुलाला लहानपणी चांगले वातावरण मिळेल, असे नाही. त्यामुळे मोनिका यांनी सुरवातीपासूनच मुलांसाठी काम करण्याचे मनावर घेतले. वीस वर्षांपूर्वी ‘आजोळ’ची स्थापना केली. सुरवातीला एका शाळेच्या पटांगणावर आणि सोसायटीच्या आवारात मुलांना शिकवायला सुरवात झाली. तिथून मोनिका यांना ‘ताई’ म्हणून संबोधले जाऊ लागले. 

नोकरीला जाणाऱ्या पालकांनी लहान मुले सांभाळाल का? म्हणून विचारणा झाली. पण, मोनिका यांना लहान मुले सांभाळणारे ‘पाळणाघर’ म्हणून ही प्रतिमा बदलायची होती. मग मोनिका यांनी स्वतः अभ्यासाला सुरवात केली. सुरू असलेल्या पाळणाघरांचा अभ्यास केला आणि वेगळेपण कसे जपता येईल म्हणून यासाठी सिंगापूरला जाऊन ‘डे केअर’बद्दल ‘डिप्लोमा’ केला. जग आणि आजूबाजूचा ‘ट्रेंड’ इतक्या जलदरीतीने बदलतो आहे. यावर फक्त ‘डिप्लोमा’ करून चालणार नाही म्हणून मोनिका यांनी डिग्री घेण्याचा विचार केला. लहान मुलांच्या विषयाशी संबंधित शिक्षणासाठी कोणताही अभ्यासक्रम भारतात उपलब्ध नाही म्हणून न्यूझीलंडमधून याविषयात पदवी घेतली.

शिक्षण परदेशात घेतले, तरी आपले भारतीय संस्कार आणि भावना जपून तीन विभागांची सुरवात केली. विविध वयाच्या मुलांचा विचार करून आजोळ-डे केअर, प्री-स्कूल आणि किड्स क्लब-अ‍ॅक्टिव्हिटी सेंटरला सुरवात केली. पुण्यात २७ शाखा सुरू केल्या आहेत. तसेच, लहान मुलांना कसे हाताळावे किंवा त्यांची कशी काळजी घ्यावी, याबद्दल ‘आजोळ’मध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाला प्रशिक्षण दिले जाते.

मोनिका म्हणतात, ‘‘व्यवसायाला प्रारंभ करताना त्या विषयातील प्राथमिक ज्ञान घेणे गरजेचे आहे. व्यवसाय करीत असलेल्या क्षेत्रात स्वतःला इतरांवर अवलंबून ठेवता कामा नये. बाजारात काय गोष्टी उपलब्ध आहेत ते डोळसपणे बघणे आवश्यक आहे. तुमच्याकडे काय उपलब्ध आहे, यापेक्षा लोकांना काय हवे आहे, त्यांची गरज काय आहे, हे लक्षात घेतले तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.’’

(शब्दांकन - गौरव मुठे)

loading image