चुकलेल्या आजीबाईंना अखेर भेटला नातू ...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 फेब्रुवारी 2019

कोल्हापूर - नातू ऊसतोडणी कामगार. त्याला भेटायला म्हणून आजीबाई परभणीहून कोल्हापूरला आल्या. पण, बसस्थानकात उतरल्यानंतर रस्ता चुकल्या. त्यातच बागल चौकात गायीने त्यांना जोरदार धडक दिली आणि त्या जखमी झाल्या

कोल्हापूर - नातू ऊसतोडणी कामगार. त्याला भेटायला म्हणून आजीबाई परभणीहून कोल्हापूरला आल्या. पण, बसस्थानकात उतरल्यानंतर रस्ता चुकल्या. त्यातच बागल चौकात गायीने त्यांना जोरदार धडक दिली आणि त्या जखमी झाल्या. व्दारकाबाई गायकवाड यांच्यावर तीन दिवसापूर्वी बेतलेला हा प्रसंग. पण, नातू हनुमान कुर्ये यांना याबाबतची माहिती मिळाली आणि त्यांनी आजीला ताब्यात घेवून गाव गाठले. 

तीन दिवसापूर्वी बागल चौकात व्दारकाबाई यांना गायीने धडक दिल्यानंतर स्थानिक नागरिकांनी घटनेची माहिती व्हाईट आर्मीला दिली. व्हाईट आर्मीच्या जवानांनी तत्काळ त्यांना सावली केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले. त्या परभणी जिल्ह्यातील असल्याचे समजले. मात्र, नातेवाईकांशी संपर्क होवू शकत नव्हता. आज त्यांचा नातू हनुमान यांना घटनेची माहिती समजताच त्यांनी व्हाईट आर्मीशी संपर्क साधला.

त्यानंतर एकूणच घटनेचा उलगडा झाला. हनुमान कुर्ये ऊस तोडणीसाठी चंदगड तालुक्‍यात असून ते मूळचे परभणी जिल्ह्यातील नवहत्ती गावचे आहेत. त्यांना भेटायला व्दारकाबाई बसने आल्या. तेथून चंदगडला जाण्याऐवजी त्या रस्ता चुकल्या आणि पुढे ही घटना घडली. दरम्यान, व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे, सावली केअर सेंटरचे किशोर देशपांडे यांच्या हस्ते त्यांना साडी-चोळी देवून गावी पाठवण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: white army and Savali care social work special story