पत्नीचे किडनीदान, पतीला जीवदान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 मार्च 2019

समाजातील प्रत्येकाला आमच्या आईसारखी आई मिळावी. अवयवदान ही संकल्पना समाजात रुजावी हीच अपेक्षा.
- सुनील सरक, माजी सरपंच, कामथ, ता. आटपाडी

झरे - वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला सात फेरे मारून सातजन्मी हा पती मिळावा, अशी प्रार्थना स्त्रिया करतात. मात्र कामथच्या संपतादेवींनी प्रत्यक्षात किडनीदान करून पतीला जीवदान देऊन खराखुरा आदर्श घालून दिला आहे. 

कामथ (ता. आटपाडी) येथील लक्ष्मण आनंदा सरक (वय ६२) निवृत्त शिक्षक. माजी सरपंचही. सतत आजारी पडत. त्यांच्यावर मिरजेचे मिशन हॉस्पिटल व कोल्हापूर येथील आनंदी नर्सिंग होममध्ये दोन वर्षे उपचार सुरू होते. त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे समजले. रुग्ण वाचवायचा कसा, कोण देणार किडनी या विचारात कुटुंब होते.

शेवटी पतीच्या दुःखनिवारणासाठी पत्नी धावून आली. संपतादेवी (वय ५६) यांनी आपली किडनी देऊन पतीला जीवदान दिले. वोव्हटा हॉस्पिटल (मुंबई सेन्ट्रल) मध्ये किडनी प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया २८ जानेवारीला झाली आणि लक्षण सरक यांना जीवदान मिळाले. पाच फेब्रुवारीला त्यांना घरी सोडण्यात आले. त्यानंतर दर तीन दिवसांनी त्यांची तपासणी सुरू झाली. सध्या तपासणीचा कालावधी दर आठ दिवसांतून एकदा असा करण्यात आला आहे. सध्या त्यांच्यावर शस्त्रक्रियेनंतरचे उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती उत्तम आहे. धन्य ती माऊली. धन्य ते दान.  

समाजातील प्रत्येकाला आमच्या आईसारखी आई मिळावी. अवयवदान ही संकल्पना समाजात रुजावी हीच अपेक्षा.
- सुनील सरक,
माजी सरपंच, कामथ, ता. आटपाडी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wife donate kidney, for husband life