दृष्टिविना तिने जिंकली आवाजाची दुनिया

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 मार्च 2019

जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कोणता यावरून तुमच्यातील मानसिकता लक्षात येते. मानसिक खच्चीकरण करणाऱ्या बाबी व घटनांकडेही आपण सकारात्मक म्हणून पहिले पाहिजे. 

बारामती - ‘‘डेंगी झाल्याने उपचार घेताना ताप उतरण्यासाठी म्हणून कोणीतरी डोळ्यावर बर्फाच्या पट्ट्या ठेवल्या आणि डोळ्याला रक्त पुरवणाऱ्या वाहिन्या खराब होऊन दृष्टीच गेली... वयाच्या २४ वर्षांपर्यंत डोळ्यांनी जग पाहिल्यानंतर डोळ्याविना जग पाहण्याची वेळ आली... मी न डगमगता जगाला सामोरी गेले. आज डोळे बंद करून आतमध्ये डोकावते आणि माझ्या क्षमता किती विस्तारल्या हे पाहते...’’ अनघा मोडक त्यांचा जीवनप्रवास सांगत होत्या.

ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या शारदा कला मंचच्या वतीने रविवारी (ता. २४) १०१ वे परिवर्तन व्याख्यान झाले. या व्याख्यानात ‘जीना इसी का नाम है’ या विषयावर अनघा मोडक यांनी शारदानगर येथील अप्पासाहेब पवार सभागृहात स्वतःला व्यक्त केले. या वेळी ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, विश्वस्त सुनंदा पवार, समन्वयक प्रशांत तनपुरे आदी उपस्थित होते.

मोडक म्हणाल्या, ‘‘दिव्यांग व्यक्तींकडे कधीही त्या अपूर्ण आहेत, असे समजून पाहू नका. त्यांच्यातील कष्ट, जिद्द, त्याग व परिश्रमाच्या तयारीने ते पूर्ण होतातच. माझ्याबाबतीतही ही वेळ आली. वयाच्या २४ वर्षांपर्यंत धडधाकट असणारी मी डेंगीचे निमित्त झाले आणि वाढलेल्या तापानंतर कोणाच्या तरी हलगर्जीने  दृष्टी गेली. 

घरी गेल्यावर काहीच दिसत नाही म्हटल्यावर माझ्या पायाखालची जमीन सरकली. कुटुंबीयांनाही धक्का बसला. मात्र, ते जाणवू न देता त्यांनी मला पाठबळ देण्यास सुरवात केली. जेव्हा दिसत नाही, ही अपरिहार्यता स्वीकारायची ठरवली, तेव्हा आई, आत्या, चुलती साऱ्यांनीच मला सकारात्मक  प्रोत्साहन देण्यास सुरवात केली. घरातील कोणत्या वस्तू मी जिथे आहे, तेथपासून किती अंतरावर आहे, हे सांगत घरातला सराव सुरू झाला. हळूहळू साऱ्या परिस्थितीवर ताबा घेतला आणि घरातून बाहेर डोकावण्याचा निर्णय घेतला. योगायोगाने २०१६ मध्ये रेडिओवर संधी मिळाली आणि सारे आयुष्यच बदलून गेले. काव्यमैफलीतील निवेदन, स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील निवेदनामुळे तर आत्मविश्वासच वाढत गेला.’’ 

सुनंदा पवार यांनी प्रास्ताविक; तर अरुण पुरी यांनी सूत्रसंचालन केले. पूजा ठोंबरे या विद्यार्थिनीने आभार मानले. 

जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कोणता यावरून तुमच्यातील मानसिकता लक्षात येते. मानसिक खच्चीकरण करणाऱ्या बाबी व घटनांकडेही आपण सकारात्मक म्हणून पहिले पाहिजे. मी कधीच दिव्यांगाचे भांडवल केले नाही, करणारही नाही. 
 - अनघा मोडक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Without the vision angha modak won the voice world