‘फेसबुक’मधून मिळतोय महिलांना रोजगार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

काय केले जाते...

  • एका टीमचे ग्रुपवर लक्ष 
  • ठरावीक दिवस प्रॉडक्‍टचे ब्रॅंडिंग
  • काय हवे तेही शेअर करू शकता
  • उत्पादनाची पोस्ट सत्यता पाहूनच अप्रूव्ह
  • सेवेबद्दल फीडबॅकही देता येतो
  • फसवणुकीचा धोका कमी

पुणे - महिलांच्या फेसबुक आणि व्हॉट्‌सॲप वापरण्यावरून अनेक जोक्‍स सोशल मीडियावर आपण वाचतो. मात्र, याच ‘फेसबुक’च्या माध्यमातून आज लाखो महिलांना घरबसल्या व्यवसाय करता येतोय. आणि त्याचे श्रेय जाते ते गेल्या काही वर्षांपासून फेसबुकवर कार्यरत असलेल्या फेसबुक ग्रुप्सना...

पुणे लेडीज, पुणे ठसका, क्‍लास अपार्ट पुणे, महाराष्ट्र लेडीज असोसिएशन असे अनेक फेसबुक ग्रुप्स महिलांनी महिलांसाठी तयार केले आहेत. जिथे घरबसल्या महिला पुण्यातील कानाकोपऱ्यातील महिला ग्राहकांपर्यंत पोचू शकत आहेत. पुण्यातील कात्रजमध्ये राहणारी निसर्ग शिंदे त्यातीलच एक. तिने दोन वर्षांपूर्वी फॅब्रिकेशन आणि टेरेस डिझायनिंग व्यवसायाला सुरवात केली. टेरेस डिझायनिंग, बाल्कनी गार्डनिंग हा घरातील महिलेच्या आवडीचा विषय असल्याने बिझनेस वाढविण्यासाठी महिला ग्राहकांपर्यंत पोचणे आवश्‍यक होते. या कामात तिला फेसबुक ग्रुपचा फायदा झाला. या ग्रुपवर आपल्या प्रॉडक्‍टचे प्रमोशन केल्याने गेल्या वर्षभरात लाखो रुपयांची उलाढाल झाली असल्याचे तिने सांगितले. एवढेच नव्हे तर ज्या महिला फेसबुक वापरत नाहीत, त्यांच्या आणि बचत गटांच्या उत्पादनांचे मार्केटिंगही या ग्रुपवर करण्याचे काम ती करते.

अनेकदा ऋतू आणि सणवारांप्रमाणे महिलांकडून विविध वस्तूंची मागणी केली जाते. त्यामुळे वर्षभर या ग्रुप्सवर शॉपिंग फेस्टिव्हल सुरू असतो. कपड्यांपासून घरातील फर्निचरपर्यंत आणि विविध दागिन्यांपासून जीवनावश्‍यक वस्तूंपर्यंत... असंख्य प्रकारच्या वस्तूंची खरेदी-विक्री या ग्रुपच्या माध्यमातून होतेय. 

एवढेच नाही तर एखाद्या कार्यक्रमासाठी आवश्‍यक इव्हेंट प्लॅनिंग, डेकोरेशन आणि केटरिंगच्या ऑर्डर्स अशा अनेक सेवाही पुरविणाऱ्या महिलांसाठी हे ग्रुप एक चांगला प्लॅटफॉर्म ठरत आहेत. केवळ महिलाच आपल्या फेसबुक अकाउंटद्वारे या ग्रुपच्या सदस्य होऊ शकतात. त्यासाठी संबंधित महिलेचे अकाउंट फेक नाही ना, याची पडताळणी केली जाते, असे पुणे लेडीज ग्रुपच्या फाउंडर ॲडमिन सोनिया कंजोती यांनी सांगितले.

ऑनलाइन खरेदीत नक्कीच धोका असतो. त्यामुळे आमच्या ग्रुपवर आम्ही व्हेरिफाइड सेलर ही संकल्पना राबवत आहोत; ज्यामध्ये विक्रेत्या महिलेची सर्व माहिती ग्रुप ॲडमिनकडे असते. व्हेरिफाइड सेलरसाठी आवश्‍यक बाबींची पूर्तता केल्यानंतरच महिला ग्रुपवर विक्री करू शकतात. ज्यामुळे आतापर्यंत फसवणुकीची कोणतीही तक्रार आली नाही.
- सोनिया कंजोती, फाउंडर, पुणे लेडीज फेसबुक ग्रुप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Women Employment by Facebook