#ThursdayMotivation : महिलेच्या अवयवदानातून नवजीवन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

साठ वर्षांची महिला अपघातात गंभीर जखमी झाल्यावर तिला ब्रेन डेड घोषित करण्यात आले. मात्र या दुःखाचा आघात बाजूला सारून तिच्या नातेवाइकांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यामुळे पाच जणांना नवजीवन मिळाले. ही किमया डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाच्या डॉक्‍टरांनी साधली.
पुण्यातील विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्राच्या प्रतीक्षा यादीप्रमाणे ६१ वर्षीय व्यक्ती यकृताच्या विकाराने त्रस्त होते.

पिंपरी - साठ वर्षांची महिला अपघातात गंभीर जखमी झाल्यावर तिला ब्रेन डेड घोषित करण्यात आले. मात्र या दुःखाचा आघात बाजूला सारून तिच्या नातेवाइकांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यामुळे पाच जणांना नवजीवन मिळाले. ही किमया डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाच्या डॉक्‍टरांनी साधली.
पुण्यातील विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्राच्या प्रतीक्षा यादीप्रमाणे ६१ वर्षीय व्यक्ती यकृताच्या विकाराने त्रस्त होते. या ब्रेनडेड महिलेकडून मिळालेल्या यकृताची या रुग्णावर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. तर ४७ वर्षीय पुरुष व ३३ वर्षीय स्त्री अशा मूत्रपिंडविकाराने त्रस्त असलेल्या रुग्णांवर मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाली. ‘माझी आई अतिशय प्रेमळ होती. आई गेल्याचे दुःख आमच्या कुटुंबाला आहे. परंतु तिचे अवयव दान करून इतर पाच व्यक्तींमध्ये आईला जिवंत पाहू शकू,’ अशी भावना अवयवदात्या महिलेच्या मुलाने व्यक्त केली.

या वर्षभरात आठ रुग्णांच्या कुटुंबीयांनी घेतलेल्या अवयवदानाच्या निर्णयामुळे २० रुग्णांना जीवनदान देण्यात यश मिळाले आहे. डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत ९ यकृत, ६७ मूत्रपिंड व १६ नेत्रपटल असे एकूण ९२ अवयव प्रत्यारोपण करण्यात आले आहेत. या डॉक्‍टरांच्या टीममध्ये मूत्रपिंड तज्ज्ञ डॉ. तुषार दिघे, यकृत विकारतज्ज्ञ डॉ. बिपिन विभूते, शरीरशास्त्र विभागप्रमुख डॉ. दीपाली काटे, मज्जासंस्था शल्यचिकित्सक डॉ. आशिष चुग, नेत्रविकारतज्ज्ञ डॉ. रेणू मगदूम, भूलतज्ज्ञ विभागप्रमुख डॉ. स्मिता जोशी यांचा सहभाग होता. या संपूर्ण प्रक्रियेसाठी सचिव डॉ. सोमनाथ पाटील, संचालक डॉ. स्मिता जाधव, विश्‍वस्त डॉ. यशराज पाटील यांचे मार्गदर्शन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमरजित सिंग, अधिष्ठाता डॉ. जे. एस. भवाळकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. एच. एच. चव्हाण यांचे यात योगदान लाभले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: women organs donate life saving motivation