कामगाराने वाचविले प्रवाशांचे प्राण

Krishna-Hate
Krishna-Hate

खापरखेडा - गुरुवारी (ता. ४) सकाळी ८ वाजता पॅसेंजर रेल्वे पाटणसावंगी रेल्वे परिसरात पोहोचली. मात्र यादरम्यान पाटणसावंगी रेल्वे स्टेशनसमोर असलेल्या किमी १३७४/५ परिसरात रेल्वे रुळाच्या मधोमध २५ हजार वॉटची विद्युत तार लटकलेल्या अवस्थेत वीज केंद्रात कार्यरत कंत्राटी कामगाराला दिसली. मोठा अनर्थ होणार याची जाणीव झाल्याने यासंदर्भातील माहिती कंत्राटी कामगाराने पाटणसावंगी रेल्वे स्टेशन येथे कार्यरत रेल्वे स्टेशन मास्टरला दिली. वेळीच विद्युत तारांचा पुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे इतवारी केळवद पॅसेंजर रेल्वेगाडीतील ५०० प्रवाशांचे प्राण वाचले. 

या कर्तबगार कंत्राटी कामगाराचे नाव कृष्णा वासुदेव हाते (वय ३४, नवीन भानेगाव) असे असून तो खापरखेडा औष्णिक वीज केंद्रात एका कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत आहे. खापरखेडा औष्णिक वीज केंद्रात सावनेर बोरगाव कोळसा खाणीतून रेल्वे वॅगनने कोळसा आणला जातो.

रेल्वेमार्गाची देखरेख करण्यासाठी पी. बी. कुंडू कंपनीचे २५ ते ३० कंत्राटी कामगार कार्यरत आहेत. गुरुवारी सकाळच्या पाळीत खापरखेडा ते सावनेर बोरगाव रेल्वेमार्ग परिसरात कर्तव्यावर हजर होते. यादरम्यान इतवारी ते केळवद पॅसेंजर जवळपास ५०० प्रवाशांना घेऊन पाटणसावंगी रेल्वे स्टेशनला आली.

किमी १३७४/५ परिसरात खापरखेडा औष्णिक वीज केंद्रातील कंत्राटी कामगार कृष्णा हाते कर्तव्यावर होते. यावेळी त्यांना रेल्वे रुळामधोमध असलेल्या २५ हजार वॉट विद्युत पॉवरची जिवंत तार लटकलेल्या अवस्थेत दिसली.

पाटणसावंगी रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवर उभी असलेली इतवारी केळवद रेल्वेगाडी सुटल्यावर मोठा अनर्थ होईल व शेकडो प्रवासी मृत्युमुखी पडतील, याची जाणीव झाल्याने कंत्राटी कामगार कृष्णा हाते यांनी पाटणसावंगी रेल्वे स्टेशन येथील स्टेशन मास्टर किनकर यांना माहिती दिली. स्टेशन मास्टर किनकर यांनी क्षणाचाही विलंब न करता उच्च अधिकाऱ्यांना कळविले.

लागलीच वीजपुरवठा खंडित करण्यात आला. जवळपास दीड ते दोन तास रेल्वे पाटणसावंगी रेल्वे स्टेशन परिसरात उभी होती. वेळीच कंत्राटी कामगार कृष्णा हाते यांनी प्रसंगावधान साधल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. कृष्णाच्या या कर्तबगार कामगिरीमुळे संपूर्ण खापरखेडा परिसरात त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com