वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी ‘ती’ घेतेय रशियाला शिक्षण

प्रमोद दंडगव्हाळ
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

आदिवासींच्या योजना फक्त कागदावरच 
आदिवासी मुलींना मोफत शिक्षण, परदेशात जाण्यासाठी शिष्यवृत्ती या योजना फक्त कागदावरच असल्याचे दिसून येते. निशाला शिष्यवृत्ती मिळण्यासाठी आदिवासी विकास विभागातील अनेक अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र आतापर्यंत एक रुपयाचीही मदत या विभागाकडून मिळाली नाही. निशाला शिक्षणासाठी वर्षाला लाखो रुपयांचा खर्च आहे. आतापर्यंत हा सर्व खर्च करताना या शेतकरी बापाला शेती विकावी लागली आहे. घर गहाण ठेवावे लागले आहे.

सिडको - स्वप्नपूर्तीला इच्छशक्तीची जोड असेल, तर आकाशही ठेंगणे होते. स्वप्न जर आई-वडिलांचे असेल, तर ते पूर्ण करण्यासाठी मग सर्व काही करण्याची तयारीही असते. याचाच प्रत्यय रायगडनगर या आदिवासी वस्तीतील निशा राजू शिद या युवतीकडे पाहून येतो. ती सध्या रशियात वैद्यकीय शिक्षण घेत आहे. यासाठी शेतकरी वडिलांनी घरदेखील गहाण ठेवले आहे. आदिवासी पाड्यातील एक मुलगी परदेशात शिक्षण घेत असल्याने गावाला भूषण आहे. 

कोणत्याही बापाला आपली मुलगी मोठी व्हावी, तिने स्वतःच्या पायावर उभे राहावे आणि नाव कमवावे, असे वाटत असते. मग त्यासाठी बाप जिवाचे रान करत असतो. त्यानंतर मिळणारे यश प्रचंड आनंद देणारे असते. परंतु मोठे शिक्षण घ्यायचे असेल तर आर्थिक खर्च मोठ्या प्रमाणात येतो. मुंबई-नाशिक महामार्गावर विल्होळीजवळ रायगडनगर हे आदिवासी गाव आहे. येथील आदिवासी बांधव शेतीवरच आपला उदरनिर्वाह करतात. याच गावातील राजू शिद शेतीव्यवसाय करून दुसऱ्याच्या वाहनावर चालक म्हणून काम करतात.

हलाखीची परिस्थिती असली तरी मुलीला डॉक्‍टर करावं हे स्वप्न त्यांनी उराशी बाळगलं आणि ते पूर्ण करण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी ठेवली. मुलीला परदेशात पाठविण्यासाठी मोठा खर्च असतो. त्यामुळे त्यांनी काही शेती विकली. काही ठिकाणाहून उसने पैसे घेतले आणि मुलीला एमबीबीएस होण्यासाठी रशियाला पाठविले. मुलीनेही जिद्द सोडली नाही. वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचेच आणि डॉक्‍टर होऊनच भारतात व गावात परत येण्याचा संकल्प केला. सध्या निशा दुसऱ्या वर्षात ओएसएच स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी (रशिया) येथे शिक्षण घेत आहे. गरीब नागरिकांसाठी मोफत वैद्यकीय उपचार व रुग्णालय सुरु करू असे निशाने सांगितले.

आमच्या समाजात कुणीही डॉक्‍टर नाही. कारण शिक्षणाचा खर्च परवडत नाही. पण मी ठरवलं आहे. मुलीला डॉक्‍टर करणारच. त्यासाठी सर्व प्रयत्न करेल.
 - राजू शिद, निशाचे वडील 

निशाला डॉक्‍टर व्हायचे आहे. वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. त्यासाठी आम्हाला जे शक्‍य होईल, ती मदत आम्ही केली. आदिवासी विभागाकडे पाठपुरावा करूनही मदत मिळाली नाही. आता तिला गरज आहे ती आर्थिक मदतीची. 
- मनोहर भावनाथ, सामाजिक कार्यकर्ते


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World Tribal Day Special Nisha Shid Education Dream Motivation