एकटी आली, आखाडा गाजवून गेली

हनुमंतखेडा (ता. सोयगाव) - यात्रा महोत्सवात शीतल गोमलाडू हिची मनोज या पहिलवानाशी कुस्ती लावताना राजेंद्र राठोड, सुभाष पवार.
हनुमंतखेडा (ता. सोयगाव) - यात्रा महोत्सवात शीतल गोमलाडू हिची मनोज या पहिलवानाशी कुस्ती लावताना राजेंद्र राठोड, सुभाष पवार.

बनोटी - यात्रेत सालाबादप्रमाणे दरवर्षी कुस्त्या होतात. शेवटची मानाची कुस्ती कोणीतरी जिंकतो, कोणीतरी हारतो. हनुमंतखेडा (ता. सोयगाव) येथील यात्रा महोत्सवात रविवारी (ता. २५) अनेक कुस्त्या झाल्या; पण त्यातील एका कुस्तीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आखाड्यात एकटीच मुलगी पहिलवान असलेल्या वैजापूरच्या शीतल गोमलाडू हिने कोपरगावच्या मनोज या पुरुष पहिलवानाशी कुस्ती करण्याचे धाडस दाखविले. आठ ते दहा मिनिटे चाललेली ही कुस्ती अनिर्णित राहिली, तरीही शीतलचे धाडस, चिकाटीला उपस्थितांनी दाद दिली. एकटी आली, आखाडा गाजवून गेली, असेच सर्वांनी तिचे वर्णन केले.  

बंजारा समाजाचे कुलदैवत आई मातेच्या दोन दिवसीय यात्रा महोत्सवात हनुमंतखेडा येथे शनिवारी (ता. २४) कुस्ती स्पर्धा झाली. शिंदोळ येथील मल्ल भय्या पाटील मानाच्या कुस्तीचा मानकरी ठरला. महिला मल्ल शीतल गोमलाडू हिने पुरुष मल्लासोबतची कुस्ती अनिर्णित ठेवून कुस्तीप्रेमींची मने जिंकली. या आखाड्यात मराठवाड्यासह खानदेश, नगर जिल्ह्यातील नामांकित मल्ल सहभागी झाले होते. पाच रुपयांपासून ते सात हजार रुपयांपर्यंतच्या कुस्त्या झाल्या. आखाड्यात प्रथमच वैजापूर येथील महिला मल्ल शीतल गोमलाडू उतरल्याने कुस्ती प्रेमींमध्ये उत्सुकता होती. मात्र, तिला प्रतिस्पर्धी महिला मल्ल मिळाली नाही. ही अडचण लक्षात घेऊन संयोजकांनी तिला कुस्ती न करता आम्ही तुला काही न काही रक्कम देऊ, असे सांगितले. त्यावर तिने कोणी पुरुष पहिलवान कुस्ती करण्यास तयार असेल तर आपण त्याच्याशी कुस्ती करू, असे सांगितले. अखेर कोपरगाव येथील साठ किलो वजनी गटातील मल्ल मनोज कुस्ती करण्यास तयार झाला. दोघांत तब्बल आठ ते दहा मिनिटे कुस्ती रंगली. त्यांच्यात निकाल न लागल्याने कुस्ती अनिर्णित राहिली. पंचांनी दोघांना प्रत्येकी अडीच हजार रुपयांचे बक्षीस विभागून दिले. याशिवाय महिलेची कुस्ती रंगतदार झाल्याने कुस्तीप्रेमींनी तिच्यावर बक्षिसांचा वर्षाव केला. विजेत्या मल्लांना शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेंद्र राठोड यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. यावेळी सरपंच दादाभाऊ चव्हाण, मल्लुसिंग राठोड, कल्पना कोतकर, विलास राठोड, चंद्रशेखर राठोड, नामदेव मोरे, अनिल पवार, नाना पवार, जयराम राठोड, कडूबा पाटील, शेखर चव्हाण, विष्णू गायकवाड, छोटू निकम यांनी पंचाची भूमिका पार पाडली. यात्रा महोत्सवात पोलिस निरीक्षक शेख शकिल यांच्या मार्गदर्शनाली ठाणे अंमलदार सुभाष पवार, दिलीप तडवी, कौतिक सपकाळ, दीपक पाटील आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता. 

भय्या पाटीलने जिंकली मानाची कुस्ती
शेवटची मानाची कुस्ती मोहळ येथील संदीप सौदर आणि वाकडी येथील भय्या पाटील यांच्यात झाली. अत्यंत रोमांचक झालेल्या या कुस्तीत संदीप सौदरला चित करीत भय्या पाटील मानकरी ठरला. त्याला सात हजारांचे बक्षीस मिळाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com