पित्याच्या जिद्दीने राष्ट्रीय स्तरावर ‘दंगल’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जून 2018

सातारा - आजोबा तसे जुन्या काळातील पैलवान, मोठे फड गाजवायचे. वडील प्रमोद पाटील थोडे शिक्षण घेऊन शेतीत गुंतले. मात्र, त्यांनाही कुस्तीची मोठी आवड. आपल्या मुलीला मोठे पैलवान करण्याची जिद्द बाळगून त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनातून पाटण तालुक्‍यातील चाफळची १३ वर्षांची साक्षी चक्क राष्ट्रीय स्तरावर पोचली आहे. 

सातारा - आजोबा तसे जुन्या काळातील पैलवान, मोठे फड गाजवायचे. वडील प्रमोद पाटील थोडे शिक्षण घेऊन शेतीत गुंतले. मात्र, त्यांनाही कुस्तीची मोठी आवड. आपल्या मुलीला मोठे पैलवान करण्याची जिद्द बाळगून त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनातून पाटण तालुक्‍यातील चाफळची १३ वर्षांची साक्षी चक्क राष्ट्रीय स्तरावर पोचली आहे. 

पाटण तालुक्‍यातील साक्षी पाटील वयाने लहान मात्र अत्यंत चुणचुणीत आणि चपळ मुलगी. गावच्या समर्थ विद्यामंदिरात शिकणाऱ्या या मुलीला कुस्तीतूनच बाळकडू मिळाले. आजोबा जगन्नाथ पाटील (माईनकर) हे ४०- ५० वर्षापूर्वीचे जुन्या पिढीतील पैलवान. आताच्या काळात बोलायचे झाले तर ते लाखाच्या पटीतील कुस्तीचे पैलवान. त्यांचा मुलगा प्रमोद हा देखील वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून कुस्त्या खेळायचा. त्याने आता घरच्या शेतीला वाहून घेतले आहे. मात्र, त्यांच्या मनातील आणि रक्तातील कुस्ती गप्प बसू देत नव्हती. सध्या शालेय कुस्ती स्पर्धांतून तसेच ऑलिंपिकलाही मुली कुस्तीत चमकत असल्याचे पाहून त्यांनाही आपल्या मुलीने कुस्तीत नाव कमवावे असे वाटले. साक्षीनेही त्यांच्या इच्छेला साथ दिली आणि साक्षीने शालेय कुस्तीसाठी कुस्तीचा पेहराव घातला. 

१३ वर्षांच्या साक्षीने तालुक्‍यात, जिल्ह्यात क्रमांक मिळविला. नंतर गेल्या वर्षी फलटण येथे झालेल्या विभागीय आंतरशालेय कुस्ती स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलींच्या ३८ किलो वजन गटात विजेतेपद मिळविले. त्यावेळी साक्षीची गावकऱ्यांनी घोड्यावरून वाजत गाजत मिरवणूक काढली. त्यानंतर साक्षीचे जिल्ह्यात नाव झाले. ग्रामीण भागात पौष महिन्यापासून गावोगावच्या यात्रा जत्रा भरतात. गाव ऐपतीप्रमाणे कुस्त्यांचे फड आयोजित करतात. जिल्ह्यातील अनेक गावांच्या जत्रांवर मुलीही कुस्तीसाठी येतात. या मुलींच्या कुस्त्या गावकरी आवर्जून लावतात आणि त्यात साक्षीने गावोगावचे फड जिंकले. 

गावात ना व्यवस्थित तालीम, ना कोणत्याही सुविधा. पण, गावकऱ्यांनी गावात शाळेच्या एका खोलीत मॅट उपलब्ध करून दिली. गावातील 
छोटे-मोठे कुस्तीगीर साक्षी आणि इतर मुलींना आधुनिक कुस्तीचे डावपेच शिकवू लागले. अर्थातच मुलींना कुस्तीसाठी घरचे पाठबळ आवश्‍यक असते. साक्षीचे वडील प्रमोद पाटील यांनी स्वतः शेतीत राबत मुलीला काही कमी पडू दिले नाही. 

कष्टाचे चीज झाल्याची भावना
साक्षी सध्या पुण्याच्या कुस्ती केंद्रात वस्ताद विजय बराटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडे प्रशिक्षण घेत आहे. नाशिक कुस्तीगीर असोसिएशनच्या वतीने नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत तिने यश मिळविले आहे. आता तिची मेरठ येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिच्यासाठी आम्ही घेत असलेल्या कष्टाचे साक्षीने चीज केल्याची भावना वडील प्रमोद पाटील आणि कुटुंबिय व्यक्‍त करतात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wrestling shakshi patil national lavel