दगड फोडून पोट भरणारं गाव

श्रीकांत मेलगे
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

मरवडे (जि. सोलापूर) - भयाण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेकांकडून रोजी-रोटीसाठी स्थलांतर करण्याचा सोयीस्कर मार्ग स्वीकारला जात आहे. या साऱ्याला अपवाद ठरत येळगी (ता. मंगळवेढा) येथील गावकऱ्यांनी स्थलांतर केल्यास सारा संसार डोक्‍यावर घेऊन वणवण करत फिरण्यापेक्षा दगड फोडून पोट भरलेलं बरं अस म्हणत खडी क्रशरची उभारणी करून दुष्काळावर मात करीत जगण्याचा नवा फंडा शोधला आहे. दगड फोडून पोट भरणारं गाव अशी या गावाची ओळख निर्माण झाली असली तरी खडी क्रशरच्या माध्यमातून गावाची आर्थिक घडी मात्र व्यवस्थित बसली आहे.

येळगी हे सातशे लोकवस्तीचे गाव. जमिनीत फुटभर खोदल्यानंतर दगडच दगड असलेली शेतजमीन. सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे अशी शेतजमीन कसताना सर्वांच्याच नाकीनऊ आल्याची स्थिती निर्माण होते.

आता जगायचं तर काहीतरी करायला हवंच ना असे म्हणत काही ग्रामस्थांनी दुसऱ्या गावाला स्थलांतर करीत आपले बस्तान बसविले. सर्व गावानेच स्थलांतर केले तर गावाचा स्मशानवाटा होईल या भीतीने अनेकांनी गावात राहणे पसंत केले आहे. ‘स्मशानातील सोनं’ ही कथा लहानपणी ऐकली असल्यामुळे आपल्या स्मशान बनत चाललेल्या गावात दगडमय असलेल्या शेतीचा आधार घेत खडी क्रेशरची उभारणी करण्यात आली. आज गावात पाच ते सहा लहानमोठे खडी क्रेशर सुरू करण्यात आलेले आहेत. प्रत्येक क्रेशरवर सात कुशल-अकुशल कामगार, ट्रॅक्‍टर, टिपर, जेसीबीच्या माध्यमातून सुमारे वीस जणांना रोजगार मिळाला आहे. गावातील जवळपास १०० हून अधिक कुटुंबातील सदस्यांना काम मिळाल्याने काम मागणारे गाव आज काम देणारे ठरले आहे. हे सर्व करीत असताना शासनाचे रीतसर परवाने काढण्यात आल्याने मोठ्‌या प्रमाणात शासनास रॉयल्टी मिळत आहे.

दुष्काळामुळे मजुरांना काम मिळत नसल्यामुळे अनेकांना स्थलांतराशिवाय पर्याय नव्हता. आता खडी क्रशरमुळे १५० पैकी १०० कुटुंबातील सदस्यांना रोजगार मिळाला आहे.
- सचिन चव्हाण, सरपंच

गावाला रोजी-रोटीचा पर्याय उरला नव्हता. दगड फोडणारी यंत्रे आली आणि कायापालट झाला. ‘दगड फोडून पोट भरणारं गाव’ ही ओळखच आम्हाला नव्या उमेदीने जगायला शिकविते.
- श्‍याम पारे, ग्रामस्थ

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yelavi Village Employment Stone Crusher Success Motivation