वारज्यातील तरुणांनी तयार केला पाणवठा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 एप्रिल 2019

जंगलातील पशू, पक्ष्यांना पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वारज्यातील तरुण पुढे सरसावले आहेत. वारजे वन उद्यान सेवा संस्थेच्या वतीने एनडीए रस्त्यावरील वनक्षेत्र परिसरात असणाऱ्या खोल खड्ड्यात टॅंकरच्या साह्याने पाणी सोडून त्यांनी पाणवठा तयार केला आहे. यामुळे जनावरांची तहान भागविण्यासाठी मदत होत आहे.

वारजे - जंगलातील पशू, पक्ष्यांना पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वारज्यातील तरुण पुढे सरसावले आहेत. वारजे वन उद्यान सेवा संस्थेच्या वतीने एनडीए रस्त्यावरील वनक्षेत्र परिसरात असणाऱ्या खोल खड्ड्यात टॅंकरच्या साह्याने पाणी सोडून त्यांनी पाणवठा तयार केला आहे. यामुळे जनावरांची तहान भागविण्यासाठी मदत होत आहे.  

वारजे वन उद्यान सेवा संस्थेचे अध्यक्ष  महेश बराटे यांच्या पुढाकाराने गेल्या नऊ वर्षांपासून हा उपक्रम राबविला जातो. उन्हाळ्यामध्ये एनडीए रस्त्यावरील वनक्षेत्र परिसरात पशुपक्षी व प्राणी मोठ्या प्रमाणात पाणी पिण्यासाठी येतात.

या ठिकाणी असलेल्या मोठ्या खड्ड्यांमध्ये दर रविवारी दहा हजार लिटर पाणीसाठा असणारा टॅंकर रिकामा केला जातो. उन्हाळा संपेपर्यंत या खड्ड्यात साठलेल्या पाण्यावर जनावरे आपली तहान भागवताना दिसतात. पाऊस पडेपर्यंत हे तरुण टॅंकरच्या पाण्याने त्यांची तहान भागवतात. यासाठी शंकर बोडके, संतोष घोसाळे, सुधीर मोरे, विकास पाटील, पांडुरंग मिराशी, गणेश दळवी यांचेही सहकार्य लाभते. यापुढील काळातही अशा पद्धतीने प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे, असे बराटे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth Animal Bird water Storage Motivation