#MondayMotivation नोकरीमुळे फुलले युवकांचे चेहरे

सकाळ वृत्तसेवा
Monday, 17 February 2020

आई किंवा वडिलांचे अकाली निधन झाल्याने छत्र हरपलेल्या ३० युवकांना शुक्रवारी जिल्हा परिषदेने सुखद धक्का दिला.

पुणे - सेवेत असताना आई किंवा वडिलांचे अकाली निधन झाल्याने छत्र हरपलेल्या ३० युवकांना शुक्रवारी जिल्हा परिषदेने सुखद धक्का दिला. पालकांचे अकाली जाण्याने आर्थिक कोंडीत सापडलेल्या युवकांना जिल्हा परिषदेच्या सेवेत सामावून घेण्याचा निर्णय घेतला. या युवकांना झेडपीच्या रिक्त जागांवर अनुकंपा तत्त्वावर पदस्थापना देण्यात आल्या. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलल्याचे पाहावयास मिळाले. या नियुक्तीमुळे अनेक वर्षांच्या खंडानंतर हे युवक आता आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायांवर उभे राहू शकणार आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील ९९ कर्मचाऱ्यांचे सेवेत असतानाच अकाली निधन झालेले आहे. या सर्व कर्मचाऱ्यांचे वारस हे गेल्या अनेक वर्षांपासून अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. त्यामुळे उपलब्ध रिक्त जागांवर त्यांना ज्येष्ठतेनुसार सेवेत घेण्याचा निर्णय नव्या अध्यक्षा निर्मला पानसरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आणि सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांनी घेतला. 

या निर्णयाची अंमलबजावणी अवघ्या दोनच दिवसांत पूर्ण केली. त्यात ३० जणांना नोकरी मिळाली आहे. उर्वरित ६९ जणांना मात्र जागा रिक्त होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. उपलब्ध रिक्त जागा आणि शैक्षणिक पात्रतेनुसार ही पदस्थापना दिल्याचे घुले यांनी सांगितले. 

पदस्थापना देताना जिल्हा परिषद प्रशासनाकडून पद आणि नियुक्तीचे ठिकाण यासाठी समुपदेशन पद्धतीचा वापर करण्यात आला. विविध विभागांमध्ये वर्ग ३ आणि वर्ग ४ मधील दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांचा नोकरी मिळालेल्यांमध्ये समावेश आहे. अध्यक्षा पानसरे यांच्या हस्ते नियुक्ती आदेश देण्यात आले. 

...अशा आहेत पदस्थापना
या प्रक्रियेद्वारे सामान्य प्रशासन विभागात एक वरिष्ठ सहायक व पाच कनिष्ठ सहायक, अर्थ विभागातील दोन वरिष्ठ सहायक (लेखा) व तीन कनिष्ठ सहायक (लेखा), ग्रामपंचायत विभागात तीन कंत्राटी ग्रामसेवक, आरोग्य विभागात ११ आरोग्य सेवक आणि एक औषध निर्माता, बांधकाम विभागात तीन कनिष्ठ अभियंता आणि एक स्थापत्य अभियांत्रिकी सहायक आदी ठिकाणी पदस्थापना देण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: youth got jobs in zp