गडकिल्ल्यांच्या जलसंवर्धनावर प्रबोधन 

सचिन माळी
Wednesday, 30 August 2017

मंडणगड - महाराष्ट्राला लाभलेली अद्वितीय संपदा गडकिल्ले आणि भीषण गंभीर बनत चाललेली पाणीटंचाई यावर भाष्य करीत पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गडकिल्ले व जलसंवर्धनाचा संदेश दिला आहे. तुतारीच्या गजरात पर्यावरणाचा संदेश घेवून येणारी किल्ले संवर्धन एक्‍स्प्रेसद्वारे गणेशभक्तांना गडकिल्ल्यांची सफर व जलसाक्षरतेची शिकवण या देखाव्याने करून आणली. 

मंडणगड - महाराष्ट्राला लाभलेली अद्वितीय संपदा गडकिल्ले आणि भीषण गंभीर बनत चाललेली पाणीटंचाई यावर भाष्य करीत पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गडकिल्ले व जलसंवर्धनाचा संदेश दिला आहे. तुतारीच्या गजरात पर्यावरणाचा संदेश घेवून येणारी किल्ले संवर्धन एक्‍स्प्रेसद्वारे गणेशभक्तांना गडकिल्ल्यांची सफर व जलसाक्षरतेची शिकवण या देखाव्याने करून आणली. 

मंडळाचे हे 45 वे वर्ष आहे. रायगड किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. किल्ल्यात प्रवेश करण्यापूर्वीच छत्रपती शिवाजी महाराज अवतरतात. पर्यटनाच्या नावाखाली विकृत लोक किल्ल्यांचे विद्रुपीकरण करीत असल्याचे सांगत उदासीन धोरणांमुळे गडकिल्ले दुर्लक्षित राहिल्याचे सांगताना नाकर्तेपणामुळे किल्ले आज उघडे बोडके पडले आहे. त्यांचे बुरुज ढासळत असल्याचे खडे बोल सुनावतात. केवळ राजकीय स्वार्थासाठी नावाचा वापर केला जात असून शासनाबरोबर सर्वांनीच दक्ष राहून किल्ल्यांचे संवर्धन करण्याचा आदेश शिवाजी महाराज देतात. त्याचवेळी किल्ल्याची प्रतिकृती असणाऱ्या इंजिनासोबत किल्ले संवर्धन एक्‍स्प्रेसचे आगमन होते. एक्‍स्प्रेस चालविणाऱ्या मुलींच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यात आला आहे. हुबेहूब रेल्वेगाडी उभारण्यात आली आहे. डब्यात बसल्यानंतर डफावरची थाप व पोवाडे कानी पडतात. किल्ल्याच्या भुयाऱ्यातून प्रवेश केल्यानंतर दरबारात आसनावर स्थानापन्न झालेली आकर्षक गणेशमूर्ती लक्ष वेधून घेत. इंद्रायणीच्या पाण्यात बुडवलेले तुकारामांचे अभंग पाण्यावर तरंगण्याचा प्रसंग जिवंत देखाव्याद्वारे सादर केला आहे. "वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी' म्हणत साडेचारशे वर्षांपूर्वी दिलेल्या पर्यावरणाच्या जतनाबरोबर जलसंवर्धनानेच पाणी टंचाईवर मात होवू शकते असा संदेश देत वृक्षतोड, शेतकरी आत्महत्या, दुष्काळ, अंधश्रद्धा, स्त्री-पुरुष समानता, अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, बलात्कार थांबविण्यासाठी सर्वांनी पुढे येत प्रयत्न करावे, तरच सुरक्षित भारताची नवनिर्मिती होईल, असे तुकाराम महाराज प्रबोधन करतात. संवादाच्या माध्यमातून विविध विषयांवर भाष्य करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ganesh festival 2017 mandangad ganesh ustav konkan