
चिपळूण - महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर आज चिपळूण तालुक्यात मराठा समाजातर्फे कडकडीत बंद पाळण्यात आला. एसटी वाहतुकीसह खासगी वाहतूक, पेट्रोल पंप व सर्व दुकाने बंद राहिली.
चिपळूण - महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर आज चिपळूण तालुक्यात मराठा समाजातर्फे कडकडीत बंद पाळण्यात आला. एसटी वाहतुकीसह खासगी वाहतूक, पेट्रोल पंप व सर्व दुकाने बंद राहिली. शहरातून मोर्चा काढून एक मराठा, लाख मराठ्याच्या घोषणा दिल्याने शहर परिसर दुमदुमले. भगवे ध्वज हाती घेत काढलेल्या मोर्चाने शहर परिसरात भगमेवय वातावरण झाले होते.
बंदच्या पार्श्वभूमीवर सकाळी साडेआठपासूनच मुंबई-गोवा महामार्गावरील अतिथी सभागृहासमोर मराठा समाजबांधव जमण्यास सुरवात झाली होती. मोर्चास सुरवात करण्यापूर्वी समाजास आरक्षण मिळावे, या मागणीसाठी बलिदान दिलेले तरुण, देशासाठी बलिदान दिलेले जवान, दापोली कृषी विद्यापीठातील मृत पावलेले अधिकारी व कर्मचार्यांना तरुणांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
जिजाऊ वंदना झाल्यानंतर मोर्चास सुरवात झाली. समाजाच्या तरुणी मोर्चाच्या अग्रभागी होत्या. अतिथी सभागृह ते युनायटेड हायस्कूल जवळून मेहता पेट्रोल पंप, चिंचनाका, पालिकेतपर्यंत मोर्चा गेला. पालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजाच्या प्रतिमेस तरुणींनी पुष्पहार अर्पण केला. तेथून बाजारपेठेतून पुन्हा चिंचनाका, भोगाळे, एसटी स्टँडमार्गे प्रांत कार्यालयासमोर मोर्चा काढण्यात आला. मोर्चात शहरासह ग्रामीण भागातील, तरुण, तरुणी, ज्येष्ठ नागरीक व समाजबांधव सहभागी झाले होते.
मोर्चा मार्गावरील वाहतूक अन्यत्र वळविण्यात आली होती. महामार्गावर मोर्चा येताच चक्का जाम झाले. दवाखाने, मेडीकल वगळता सर्वत्र कडकडीत बंद होता. बाजारपेठेतील चिपळूण अर्बन बँक नेहमीप्रमाणे आजही सकाळी सुरू होती. तेथे तरूणांचा जमाव गेल्याने बँकेचे शटर डाऊन करण्यास भाग पाडले.
मराठा समाजबांधवांनी मुंबई गोवा महामार्गावर ठिय्या आंदोलन केले. प्रांत कार्यालयासमोर हे आंदोलन झाल्याने महामार्गावरील वाहतूक वळविण्यात आली. ठिय्या आंदोलन करून शासनविरोधी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सुमारे अडीच तास हा मोर्चा सुरू होता.
मुंबई गोवा महामार्गावर मोर्चा येताच महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. गुहागर बायपास मार्गे ते फरशी तिठाकडे वळवली. मोर्चा प्रांत कार्यालयासमोर येताच मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. तरुणींच्या हस्ते प्रांत कार्यालयात तहसीलदार जीवन देसाई यांना निवेदन दिले. महिलांनीही यात सहभागी होत महामार्गावर ठिय्या दिला.
बंदमुळे शहरातील एकही दुकान उघडे नव्हते. मराठा क्रांती मोर्चा समितीने पिण्याचे पाणी व वडापावची व्यवस्था केली होती. शहरात महामार्गासह महत्वाच्या जागी बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सुमारे शंभरहून अधिक पोलिसांचा ताफा तैनात केला होता. शांततेत मोर्चा व ठिय्या आंदोलन झाल्याने दिवसभरात शहरात कुठेही कायदा हातात घेण्याचा प्रकार घडला नाही.