Maratha Kranti Morcha :रत्नागिरीत एसटी, रिक्षा,शाळा बंद

राजेश शेळके
Thursday, 9 August 2018

रत्नागिरी - मराठा क्रांती मोर्चाच्या आजच्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला रत्नागिरीत चांगला प्रतिसाद मिळाला. व्यापारी संघाने बंदमध्ये सामिल न होण्याची भूमिका बुधवारीच (ता. 8) स्पष्ट केली होती. त्यामुळे शहरातील दुकाने, टपर्‍या, हॉटेल सुरू होती. मात्र एसटी महामंडळाने सर्व फेर्‍या रद्द केल्या.

शाळा, कॉलेजनाही सुट्टी देण्यात आली होती. घोषणाबाजी करत मराठा समाजाने मारूती मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी रॅली काढली. त्यानंतर पोलिसांच्या परवानगीने शांततेत शहरात मोर्चा काढला. 

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठीच्या लढ्याला आज वर्ष झाले. वर्धापनदिन म्हणून सकल मराठा क्रांती मोर्चाने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. राज्यात काही ठिकाणी या बंदला हिंसक वळण लागले. वाहनांची जाळपोळ झाली. रत्नागिरीत मारूती मंदिर येथे सकाळी नऊ वाजता मराठा बांधव एकत्र आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून घोषणाबाजी देत आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सरकले. अरे कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय शिवाजी; जय भवानी अशा घोषणा देण्यात येत होत्या.

रॅलीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. ठिय्यानंतर तेथेच सभा घेण्यात आली. मात्र काही तरूणांनी शहरातून मोर्चा नेण्याचा आग्रह पोलिसांना केला. मोर्चेकरांनी स्वतःच्या जबाबदारीवर आणि कोणताही अनुचित प्रकार न करता काढावा, अशी ताकीद पोलिसांनी दिली. मोर्चेकरांनी जबाबदारी स्वीकारत शहरातून मोर्चा काढला. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha Kranti Morcha Band in Ratnagiri